• Tue. Aug 19th, 2025

परवडत नसेल तर कांदा खाऊ नका-कॅबिनेट मंत्री दादा भुसे

Byjantaadmin

Aug 21, 2023

केंद्राने कांदा निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. तर कांद्याच्या संभाव्य दरवाढीमुळे नागरीक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यातच आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कांद्याच्या दरवाढीवरून ओरड करणाऱ्यांना तो न खाण्याचा सल्ला दिला आहे. ‘ज्याला कांदा परवडत नाही, त्यांनी 2-4 महिने कांदा खाल्ला नाही, तर काही बिघडत नाही, असे ते म्हणालेत.

 

कांदा निर्यात शुल्कात 40% वाढ

केंद्राने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. त्यांनी नाशिक भागात तीव्र आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी उपरोक्त वादग्रस्त विधान केले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, दर पडणार नाही, याची काळजी सरकार घेईल. शेतकऱ्यांना कांद्याचे दर कोसळण्याची भीती वाटत आहे. कांदे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. या भावना केंद्राच्या कानावर घातल्या जातील. त्यावर केंद्र निश्चितच सकारात्मक मार्ग काढेल.

योग्य ते नियोजन केले जाईल

दादा भुसे पुढे म्हणाले की, अनेकदा कांद्याला 200 ते 300 भाव मिळतो. काही वेळा तो 2 हजारांपर्यंतही जातो. त्यामुळे उत्पादन व पुरवठा याचे नियोजन करावे लागते. नाशिक जिल्ह्यातील हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे नियोजन या प्रकरणी केले जाईल.

…तर 2-4 महिने कांदे खाऊ नका

निर्यातीतील शुल्क दरवाढ नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याचा विचार घेऊन घेणे गरजेचे होते. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला, तर काहीच अडचण नाही. आपण 1 लाखांची गाडी वापरतो. त्यामुळे 10 – 20 रुपये जास्त देऊन 20 माल खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही, त्याने 2-4 महिने कांदा खाल्ला नाही तर काही बिघडत नाही, असेही दादा भुसे यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर निशाणा

दादा भुसे यांनी यावेळी संजय राऊत यांनी निवडणूक लढवण्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचाही चिमटा काढला. ते म्हणाले की, सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जनतेमध्ये गेल्यानंतर मतदार राजा काय असतो हे कळते. एसी केबिनमध्ये बसून सर्वसामान्यांचे प्रश्न कळत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *