राज्यभरात तलाठी पदाच्या परीक्षा सुरू असून त्या आधी सर्व्हर डाऊन झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे. आता दुपारी दोन वाजता परीक्षा होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
हे सरकार फक्त सत्ता, सत्ता आणि सत्ता यातच व्यस्त आहे. बाकी लोकं गेली खड्ड्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर, सरकारला काही गांभीर्य आहे की नाही? की यातही काही काळंबेरं आहे?, असे सवाल रोहित पवार यांनी विचारले आहे.
हजार रुपये शुल्क घेऊनही त्रास
रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की, तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी 8 वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणे अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबली आहे. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?
मी आधीच इशारा दिला होता
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्यासकट अनेकांनी सर्वांनी ट्वीट करत सावधानता बाळगा, पेपरमध्ये काही गडबड होऊ शकते असे सांगितले होते. पण हे सरकार कोणत्याही परिस्थितीत गंभीर नसल्याने हा गोंधळ उडाला. सरकारच्या डोक्यात सत्तेचे राजकारण इतके भिनलेले आहे की सत्ता, सत्ता आणि सत्ता बाकी लोकं गेली खड्ड्यात, अशी यांची भूमिका आहे,
17 ऑगस्टला फुटला होता पेपर
दरम्यान, राज्यात 17 ऑगस्टपासून तलाठी परीक्षा सुरू झाली. परंतु, पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. आता पुन्हा सर्व्हर डाऊन झाल्याने त्याचा नाहक त्रास परीक्षार्थींना सहन करावा लागत आहे.