अजित पवार महाविकास आघाडीत होते तेव्हा भ्रष्टाचारी होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर 75 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. आता ते भाजपसोबत आहेत. अजित पवार भाजपसोबत गेल्यावर ईडी झोपेची गोळी खाऊन झोपली. अजित पवारांच्या घरचा पत्तादेखील विसरली, असा टोलाही कन्हैया कुमार यांनी लगावला.दरम्यान कन्हैया कुमार पुढे बोलताना म्हणाले की, भाजप घराणेशाहीवर बोलत आहेत. परंतु, घराणेशाही त्यांच्याकडे असली तर ती योग्य असते आणि विरोधकांकडे असेल तर ती चुकीची ठरते.
भिती का पसरवली जातेय?
भाजप खोटा इतिहास तुमच्यासमोर ठेवत आहे. मात्र, तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहा. तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज येत असेल, अब्दुलला 11 भाऊ-बहीण आहेत. देशात मुस्लिमांची संख्या वाढली तर देशातली लोकशाही, संविधान समाप्त होईल आणि शरिया कायदा लागू होईल,असे मेसेज आपल्याला का येतात? ही भिती का पसरवली जातेय? कारण तुम्ही या गोष्टी सोडून इतर गोष्टींचा विचार करू नये, असा त्यांचा डाव असल्याचा आरोपही कन्हैय्या कुमार यांनी केला.
कोल्हापुरात काँग्रेसचा कार्यक्रम
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार उपस्थित होते. यावेळी कन्हैय्या कुमार यांनी भाजपवर कडाडून टीका केली. आपल्याला आपला देश आणि स्वातंत्र्य टिकवायचे आहे. काँग्रेस त्यात आघाडीवर आहे. भाजप तुम्हाला इकडच्या-तिकडच्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतील परंतु, तुम्ही ठाम राहा असे कन्हैय्या कुमार म्हणाले.