• Tue. Aug 19th, 2025

भाजीपाला घ्यायला घराबाहेर पडल्या, चोरट्यांनी केंद्रीय मंत्र्याच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचलं

Byjantaadmin

Aug 20, 2023

नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसांपासून वाढत चालली आहे. शहरात हत्या, हाणामारी , वाहनांची तोडफोड करत दहशत माजवणे, मंगळसूत्र ओरबाडणे यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता तर या भामट्यांनी तर कहरच केला. चक्क केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मातोश्रींचे मंगळसूत्र देखील अज्ञात भामट्यांनी लंपास केलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. १९) रोजी सायंकाळी ७.३० वा सुमारास पेठरोड येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mangalsutra of Nashik Minister Bharti Pawar Mother Stolen

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई बागूल (७३, रा. दुर्गानगर, पेठरोड, मखमलाबाद) या भाजीपाला घेऊन पायी जात असताना समोरून पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागूल यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी खेचली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचा नातू बाहेर आला. त्याने दुचाकीचा पाठलाग केला. मात्र, तोपर्यंत सोनसाखळी चोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते
या प्रकरणी शांताबाई बागूल यांनी स्वतः म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचे पथक सीसीटीव्हीद्वारे संशयितांचा शोध घेत आहेत. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मातोश्री यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याने या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सामान्य नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. चोरट्यांना आणि भामट्यांना पोलिसांचा धाक नसल्याची ही प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत.भारती पवार यांच्या मातोश्री नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असून भाजीपाला घेण्यासाठी आल्या असताना हा प्रकार घडला आहे. त्यांनी या प्रकरणाची म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस देखील सोनसाखळी ओरबाडणाऱ्या संशयतांचा शोध घेतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *