देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती असून आपल्या वडिलांना अनोख्या पद्धतीने राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधी यांनी स्पोर्ट बाइक चालवत लडाख भ्रमंती केली. या सोबतच तब्बल १४ हजार २७० फुटांवर असलेल्या पँगोग तलावाच्या काठावर त्यांनी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्याची शपथ देखील घेतली.राहुल गांधी यांनी ट्विटवर देखील येथील व्हिडिओ ट्विट करत राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांचे स्मरण करत त्यांनी लिहिले आहे की, पप्पा, तुमच्या डोळ्यांत भारतासाठी जी स्वप्नं होती, ती या अनमोल आठवणींमधून दिसत असून तुमची स्वप्न हाच माझा मार्ग आहे. प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्न समजून घेत भारत मातेचा आवाज ऐकतोय असे राहुल गांधी ट्विट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पँगोग तलाव येथील कार्यक्रमानंतर राहुल गांधी यांनी चीनवर देखील हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, लडाख येथील नागरिक म्हणत आहेत की, चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसले आहेत. मात्र, पंतप्रधान म्हणतात की, “इथे कोणीच घुसखोरी झालेली नाही. त्यांचा हा दावा खरा नाही. भारत जोडो यात्रेदरम्यान आम्हाला इथे यायचं होतं, पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. लडाख येथे अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. येथील नागरिक खूश नाहीत. लोकांना प्रतिनिधित्व हवंय. राज्य नोकरशाहीनं चालवू नये, असे गांधी म्हणाले.राहुल गांधी हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० कलम रद्द केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. पुढच्या आठवड्यात ते कारगिलला जाणार आहेत.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi pays tribute to his father and former Prime Minister Rajiv Gandhi on his birth anniversary from the banks of Pangong Tso in Ladakh pic.twitter.com/OMXWIXR3m2
— ANI (@ANI) August 20, 2023