• Tue. Aug 19th, 2025

‘महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा हे स्पष्ट’; अमित ठाकरेंचा हल्लाबोल

Byjantaadmin

Aug 19, 2023

सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटेचा मुहूर्त निश्चित केला नाही, यासाठी कुलपतींचे मनःपूर्वक आभार, अशा खोचक शब्दात मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक ‘पुढील आदेश येईपर्यंत विद्यापीठाने स्थगित करणे अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी कुलपती रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे.
या पत्रात अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली आहे. या आधी आदित्य ठाकरे यांनी देखील या निर्णयावर कडक शब्दात टीका केली होती. सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरत आहेत? असा सवाल या निमित्त सर्वच विरोध विचारत आहेत.
काय म्हणाले अमित ठाकरे
अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात कडक शब्दात टीका केली आहे. वाचा अमित ठाकरे यांचे पत्र त्यांच्याच शब्दात….

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक ‘पुढील आदेश येईपर्यंत विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. ही निवडणूक लढवू इच्छिणारे नोंदणीकृत पदवीधर उमेदवार आज (शुक्रवार दि. १८ ऑगस्ट) सकाळी आपले उमेदवारी अर्ज विद्यापीठात दाखल करणार होते. मात्र केवळ १२ तास आधी, काल रात्री ११च्या सुमारास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांनी कालच्या शासन पत्राचा संदर्भ देऊन, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कालच्याच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर केलं. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली हे नमूद करण्याची पारदर्शकता दाखवणेही विद्यापीठाच्या कुलसचिवांना गरजेचे वाटले नाही.

आपल्याला माहितच आहे की, राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुशिक्षितांसाठी सिनेट निवडणूक ही व्यवस्थेत प्रवेश करण्याची पहिली पायरी असते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह इतरही अनेक विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कारभाराबाबत तसंच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्यांबाबत काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या केवळ १२ तास अगोदर ही निवडणूक स्थगित करण्यात आल्यामुळे आता एक वेगळीच शंका उमेदवार तसंच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सुमारे ९५ हजार पदवीधरांच्या मनात उपस्थित झाली आहे मुंबई विद्यापीठाचे प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे ?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनशील प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि सिनेट निवडणूक नेमक्या कोणत्या कारणाने ‘रातोरात’ स्थगित करण्यात आली हे स्पष्ट करावे, हीच आग्रहाची मागणी.

सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटेचा मुहूर्त निश्चित केला नाही, यासाठी कुलपतींचे मनःपूर्वक आभार!

निवडणूक स्थगित:मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक; आदित्य ठाकरे यांची शिंदेंवर बोचरी टीका, म्हणाले ते निवडणुकीला घाबरतात का?

आपले मुख्यमंत्री हे एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती. आणि आता ते निवडणुकीला घाबरत आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक स्थगित केली, अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयावरुन त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *