विधानसभेच्या निवडणुकीनंतर 2019 ला जेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले होते. मात्र, त्यांच्यासोबत काम करण्यास भाजप तयार नव्हती. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केल्यानेच भाजपने युती तोडली, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनाची युती का तुटली, यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यामध्ये कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय, अशा प्रकारची टीका करण्यात आली आहे. यावरुन भाजपच्या वतीने सामनातील भाषेवर टीका करण्यात आली. त्यावर स्पष्टीकरण देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही फडणवीस यांच्यावर टीका केली नाही. तर उलट फडणवीस हे सद्गृहस्थ असल्याचे म्हटले आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
फडणवीसांच्या वरिष्ठांनी बेईमानी केली
देवेंद्र फडणवीस हे जुने भाजपचे नेते आहेत. ज्या भाजपचा उल्लेख नितीन गडकरी यांनी केला आहे. आम्ही फक्त त्यांना आरसा दाखवला आहे. फडणवीस म्हणाले होते की, आमच्याशी बेईमानी केली म्हणून आम्ही शिवसेना फोडली. पण राष्ट्रवादी पक्ष का फोडला. त्यांना आम्ही केवळ आरसा दाखवला असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. बेईमानी आम्ही केली नाही तर तुमच्या वरिष्ठांनी बेईमानी केली, असे देखील आम्ही फडणवीसांना सांगितले असल्याचे खासदार राऊत म्हणाले. तुम्ही जो ड्युप्लिकेट माल घेऊन बसला आहात ती बेईमानी आहे. 2014 आणि 2019 तुम्ही बेईमानी केली म्हणून तुमच्यावर बनावट लोकांना सोबत घ्यायची वेळ आली आहे.
नितीन गडकरींचे वक्तव्य, खडसेंचा खुलासा
2014 ला कुणी युती तोडली, यावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खुलासा केला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. इतकेच नाही गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘आम्ही असे कुठे म्हणालो की हा देवेंद्र फडणवीस यांचा अपराध आहे म्हणून? तुमचे वरिष्ठ शब्दाला जागले नाहीत. त्यांनी शब्द राखला नाही.’