राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची, यावर तर्क वितर्क दिले जात आहेत. अशातच दोन्ही गटाकडून एकत्र येण्याच्या हालचाली देखील दिसत आहेत. असे असले तरी आगामी निवडणुकीती तयारी दोन्ही गट करताना दिसत आहे. त्यात आता एकीकडे शरद पवारांच्या सभा होत आहेत तर अजित पवार गटाकडून उत्तर सभा घेण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी अजित पवारांनी स्पेशल प्लॅन तयार केला आहे. यात नऊ मंत्र्यांवर राज्यभरातील जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
शरद पवार यांनी भाजप सोबत येण्यास नकार दिल्यामुळे आगामी काळात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष मोठ्या प्रमाणात राज्याला पाहिला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा प्रत्यय शरद पवारांच्या सभांमधून दिसून येतो. त्यामुळे आता अजित पवार गटाने आपल्या नऊ मंत्र्यांवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये नवे कार्यकर्ते पक्षात घेणे, विद्यमान नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करणे अशा जबाबदाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अजित पवारांवर देखील जबाबदारी
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूरची जबाबदारी देण्यात आली आहे.
पाहा कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी?
- अजित पवार – पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
- प्रफुल पटेल – भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर
- छगन भुजबळ – नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर
- दिलीप वळसे पाटील – अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा
- हसन मुश्रीफ – कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि अहमदनगर
- धनंजय मुंडे – बीड, परभणी, नांदेड, आणि जालना
- संजय बनसोडे – हिंगोली,लातूर आणि उस्मानाबाद
- आदिती तटकरे – रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर
- अनिल पाटील – जळगाव, धुळे आणि नंदुरबार
- धर्मारावबाबा आत्राम – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ