‘मुख्य’चे ‘उप’ झाल्याने देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ‘देशी’ नशेत त्यांच्या झोकांड्या जात आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे. मात्र, अशी टीका खपवून घेणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
वृत्तपत्र रोज आग ओकतोय
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सामना वृत्तपत्राविरोधात आम्ही तक्रार करणार आहोत. रोज रोज हे वृत्तपत्र जी आग ओकतोय, ती थांबवावीच लागेल. त्यासाठी काय करायचे, याबाबतही आम्ही लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहोत. कोर्टात आणि रस्त्यावरही लढाई करण्याचा आम्ही विचार करतोय.
अशा टीकेचा अधिकार नाही
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गरळ ओकली. एखाद्याच्या खासगी जीवनावर, व्यक्तिगत टीका करण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही. अशा प्रकारचे स्वातंत्र्य खपवून घेतले जाणार नाही.
उद्धव ठाकरेच खरे गद्दार
2019 मध्ये दिल्लीनेच शिवसेनेसोबत गद्दारी करून युती तोडली, असा आरोपही आज सामनात करण्यात आला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 2019 साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवले. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे.
सुंभ जळाला तरी पिळ कायम
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत.
जळफळाट फार काळ टिकणार नाही
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- 2 मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा.