• Tue. Aug 19th, 2025

भाजपचे ‘दुकान’ जोरात सुरू, मात्र नवीनच ग्राहक जास्त, ओरिजनल कुठे दिसेना; नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी

Byjantaadmin

Aug 19, 2023

आता भाजप मोठा झाला आहे, दाही दिशांना विस्तारला आहे. भाजपचे ‘दुकान’ जोरात सुरू आहे. मात्र या दुकानात नवीन ग्राहकच जास्त दिसत आहेत. जुने, ओरिजनल ग्राहक काही दिसत नाही, असा जबरदस्त टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्याच पक्षाला लगावला.

आज केवळ सत्ताकारण

बुलढाणा येथे एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी सध्याच्या राजकारणावरही नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. नितीन गडकरी म्हणाले, आज राजकारणाचा बाज बदलला आहे, व्याख्या बदलली आहे. आजचे राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण असे स्वरूप झाले आहे.

कार्यकर्त्यांमुळेच भाजप शिखरावर

नितीन गडकरी म्हणाले, आज भाजप सर्वोच्च शिखरावर आहे. यामागे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेला त्याग, परिश्रम हेच कारण आहे. जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात काम केले. तेव्हा आपल्या पक्षाला, त्यामुळे कार्यकर्त्यांना मान सन्मान प्रतिष्ठाही नव्हती. तेव्हा निवडणुका म्हणजे आपण

हमखास पराभूत व्हायचो. त्यावेळी येथे बुलढाणा जिह्यातही अनेकांनी प्रवाहाच्या विरोधात काम केले. त्यांनी कधी मान सन्मानाची अपेक्षा ठेवली नाही. पक्षासाठी देशासाठी अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान केले. त्यातूनच आज हा पक्ष उभा आहे.

जुन्या नेत्यांची जाण ठेवा

जेव्हा दुकान चालायला लागते तेव्हा ग्राहकांची कमी नसते असे सांगून गडकरी पुढे म्हणाले, आता भाजपचे दुकान चांगले चालू आहे. ग्राहकांची कमी नाही, पण ओरिजनल ग्राहक कुठे दिसत नाही. माझ्यासारख्या लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे की आज जे चांगले दिवस आम्हाला पहायला मिळतायत ते जुन्या कार्यकर्त्यांमुळेच. त्यांची जाण ठेवा, असेही त्यांनी सुनावले.

संजय राऊतांचाही टोला

नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे दुकान बनावट आहे. आधी आम्ही बोलत होतो, आता नितीन गडकरी बोलत आहेत. यासाठी गडकरी यांचे अभिनंदन करायला हवे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *