पुणे: बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा तयार झाल्याने मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून पूर्व विदर्भाला ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या सोबतच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. येथील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे
बंगालच्या उपसागरात वायव्य दिशेला ओदिशाच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे २१ ऑगस्टपर्यंत विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. या काळात विदर्भात चांगला पाऊस अपेक्षित आहे. नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज शनिवारी सकाळी ८ पर्यंत पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या सोबतच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.पावसाने ऑगस्ट महिन्यात दडी मारली होती. यामुळे पावसाच्या प्रमाणात मोठी तूट झाली होती. पवसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्या रखडलेल्या होत्या. मात्र, आता पावसाने पुनरागमन केले आहे. राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. विदर्भात पावसाचा जोर कालपासून पासून वाढला आहे. विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं हवामान खात्याने विदर्भात ऑरेंज तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे.