रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, नेतृत्वबदलाच्या चर्चेमुळे महायुती सरकारमधील सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सचिव व मंत्र्यांना दालनाबाहेर पाठवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्यात ४५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. त्यामुळे बाहेर बसलेले मंत्री व शिंदेसेना आमदारांची अस्वस्थता वाढली.मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर कॅबिनेट हॉलमध्ये बैठक झाली. त्यानंतर शिंदे व महाजन हे दोघेच शेजारच्या एका दालनात गेले. त्यांची गोपनीय चर्चा सुरू झाली. १० ते १५ मिनिटांनंतर कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांना पाचारण करण्यात आले. ते धावत आले व दालनात गेले. १५ मिनिटांनी देसाई एकटेच बाहेर पडले व शिंदे-महाजन यांच्यात नंतरही चर्चा सुरू होती. या दालनाबाहेर रोहयोमंत्री संदिपान भुमरे, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव व काही आमदार ताटकळत बसून होते. ४५ मिनिटांनंतर बैठक संपली. नंतर शिंदे कुणालाही काही न बोलता दुसऱ्या दरवाजातून सहाव्या मजल्यावरील आपल्या कार्यालयात गेले. पाठोपाठ महाजनही निघून गेले. या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. ताटकळत बसलेल्या भुमरेंना आमदार संजय शिरसाट गमतीने म्हणाले, ‘कॅबिनेट बैठक संपली, आता मंत्र्यांनी आपल्या केबिनमध्ये जावे.’ त्याला भुमरेंनीही हसून प्रतिसाद दिला.
अर्ध्या भाकरीची चतकोर झाली, तीही वाटून घेऊ : गोगावले
पत्नीच्या आत्महत्येची, राणेंच्या नावाची धमकी देऊन काही आमदारांनी शिंदेंकडून मंत्रिपद घेतले, असा दावा करणारे भरत गोगावले यांनी घूमजाव केले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला, शिळ्या कढीला ऊत नको असे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारावर ते म्हणाले, पूर्वी अर्धी भाकरी होती, आता ती चतकोर झाली. पण त्यातही वाटून घेऊ. विस्ताराचे पंचांग बघूनच सांगतो.’
मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकर घ्या : बावनकुळे
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आजवर शिंदेसेनेचे नेते बोलत होते. अस्वस्थता असूनही भाजप नेते मात्र तोंड उघडण्याचे धाडस करत नव्हते. मात्र आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच पक्षातील इच्छुकांच्या मागणीला वाचा फोडली. ‘मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी लवकरात लवकर, हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार करावा यासाठी आपण स्वत: बोलू,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ निर्णयाचे श्रेय एकट्याने घेण्याचा अजितदादांचा प्रयत्न
मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे १० निर्णय घेण्यात आले. आजवर शिंदे व फडणवीस यांच्या फोटोंसह हे निर्णय सोशल मीडियावर जाहीर केले जात. मात्र शुक्रवारी एकट्या अजितदादांच्या फोटोसह निर्णय जाहीर करण्यात आले. जणू एकट्या दादांनीच हे निर्णय घेतले हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे शिवसेना, भाजपत नाराजी आहे.