2021 मध्ये नवाब मलिक यांनी गर्दी जमवत कोरोना नियमांचे उल्लंघन केले, असा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली होती. यासाठी त्यांनी प्रथम दंडाधिकारी न्यायालय व त्यानंतर शिवडी सत्र न्यायालयातही धाव घेतली. मात्र, आता आपली तक्रार मागे घेण्यासाठी कंबोज यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या या विनंतीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
नेमके प्रकरण काय?
आर्यन खान प्रकरणानंतर नबाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आरोपानंतर कंबोज यांनी शिवडी न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान नवाब मलिक 29 नोव्हेंबर, 2021रोजी शिवडी कोर्टात हजर झाले. मात्र, मोहित कंबोज यांनी आरोप केला आहे की, सुनावणीदरम्यान कोर्टाबाहेर नवाब मलिक यांनी मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा केले होते. याप्रकरणी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत मोहित कंबोज यांनी म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी असे करून कोविड नियमांची, प्राकृतिक आपदा अधिनियमचा उल्लंघन केला आहे. आम्ही पोलिसांत तक्रार करून सुद्धा पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही. म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून योग्य ती कार्रवाई करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी मोहित कंबोज यांनी कोर्टाकडे केली होती.
28 ऑगस्टला होणार सुनावणी
मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर शिवडी कोर्टात पुढील सुनावणी 28 ऑगस्टरोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मोहीत कंबोज यांनी न्यायालयाला आपली तक्रार मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मलिकांना आपल्याकडे खेचण्याचा दादांचा प्रयत्न
एकेकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील राजकारणाचे चित्रच बदलले आहे. राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त आमदारांना आपल्यासोबत घेण्यासाठी अजित पवार सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच नवाब मलिक यांच्या जामिनाला पूर्वी जोरदार विरोध करणाऱ्या ईडीनेही न्यायालयात सौम्य भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. नवाब मलिक अजितदादांसोबत गेल्यास त्यांना ईडी कारवाईपासून दिलासा मिळू शकेल, असेही बोलले जात असतानाच आता भाजप नेते व देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जाणारे मोहित कंबोज यांनीच नवाब मलिकांविरोधातील तक्रार मागे घेण्याची विनंती केल्याने याचे अनेक राजकीय अर्थ काढले जाणार आहे.