सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणारच असल्याचे मी ठासून सांगतो, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या दाव्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सप्टेंबरमध्ये सत्तेतून पायउतार होणारच आहेत. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी वरील दावा केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, एखाद्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री असतात तेव्हा दोन पैकी एक उपमुख्यमंत्री नसतो. दोन उपमुख्यमंत्री असतात तेव्हा मुख्यमंत्री नसतात. मुख्यमंत्र्यांनी भोजनाचे आमंत्रण दिले त्याला एका उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. यावरून राज्यात सर्व काही अलबेल सुरू आहे असे म्हणता येत नाही.
विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चालले आहे. राज्यात काहीच अलबेल नाही. आगामी 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील, असा दावाही त्यांनी केला. राज्यातील जनता हे बदल पाहणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात मुख्य खुर्ची पासूनच या बदलला सुरुवात होईल असे मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असे मी म्हणत नाही. पण मुख्य खुर्ची मात्र बदलेल, असा मोठा दावाच विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
…तो पुतळा अनधिकृतच होता
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्ला चढवला. कर्नाटकात जो पुतळा हटवला गेला, तो अनधिकृत पुतळा होता. त्या पुतळ्याचा चेहरा आणि महाराजांचा चेहरा यात फरक होता. अनधिकृतपणे तो पुतळा बसवला होता. भाजपने थोडी तरी माहिती घ्यावी. तोंडात आले बकून दिले असे करू नका. कर्नाटकात भाजपचे सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 ते 12 पुतळे हटवण्यात आले होते, ते अनधिकृत होते. तेव्हा का बोलले नाहीत? तेव्हा तोंड शिवलेले होते का? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येची पर्वा नाही
तिन्ही पक्षाच्या महत्त्वकांक्षा आहे. प्रत्येकजण जेवढा हात मारता येईल तेवढा हात मारण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची त्यांना पर्वा नसल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार चालवायचे म्हणून चालवले जात असल्याची खरमरीत टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.