सरकारने शिक्षणाकडे अनुत्पादक घटक म्हणून पाहू नये – प्रा.डाॅ.डी.एन.मोरे
औराद शहाजानी :- व्यक्ती व देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षण हा आवश्यक घटक असून सरकारने शिक्षणाकडे अनुत्पादक घटक म्हणून पाहू नये असे प्रतिपादन प्रा.डाॅ.डी.एन.मोरे,पीपल्स महाविद्यालय,नांदेड यांनी केले.
येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कै.विश्वनाथराव वलांडे गुरुजी स्मृती व्याख्यानमालेत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि रिसर्च अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० रोजी आयोजित ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : परिणाम,अंमलबजावणी व आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात दुसरे पुष्प गुंफताना प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदोपासक शिक्षण संस्थेचे संचालक तथा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शिवाजीराव जाधव होते. पुढे बोलताना डाॅ.मोरे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढवणे, संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमास चालना देणे, बहुविद्याशाखीय शिक्षणाची संधी व सोय, व्यावसायिक शिक्षणावर भर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच ऑनलाईन व डिजीटल शिक्षणसाठी भौतिक संसाधनांंचा अभाव, शिक्षणावर आजवरच्या सर्व सरकारकडून करण्यात येणारा अल्प खर्च, अलीकडील काळात सार्वजनिक विद्यापीठांच्या तुलनेत खाजगी विद्यापीठांची वाढती संख्या, ३००० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या अनेक महाविद्यालयाचे पुढे काय अशा अनेक बाबींवर विचार होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळेस म्हटले.
अध्यक्षीय समारोप शिवाजीराव जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.भगवान कदम यांनी केले.प्रास्ताविक डाॅ.शंकर कल्याणे यांनी केले व प्रमुख अतिथींचा परिचय डाॅ.विजयकुमार पवार यांनी तर डाॅ.विनोद जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, सचिव रमेश बगदूरे, प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, माजी प्राध्यापक व कर्मचारी,ग्रामस्थ यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.