• Mon. Aug 18th, 2025

मुंडे बहीण भावाच्या सगळ्या खाचाखोचा माहिती, धनुभाऊंचा खास दोस्त पवारांच्या गळाला कसा लागला?

Byjantaadmin

Aug 18, 2023

बीड : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या येवल्यात जंगी सभा घेतल्यानंतर गुरूवारी त्यांनी मुंडेंच्या बीडमध्ये पाऊल ठेवलं. आपल्या भाषणात धनुभाऊंना अस्मान दाखविण्याची तयारी मतदारांनी केल्याचं सांगत त्यांच्याविरोधातील मोहऱ्याच्या हाती घड्याळही बांधलं. तरुण त़फदार नेते बबन गित्ते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश करून मुंडेंविरोधातल्या लढाईला त्यांनी सुरूवात केली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीत वाढलेले आणि पुढे धनंजय आणि पंकजा या दोघांनाही साथ दिलेले गित्ते यांनी वेगळी वाट निवडली. बहीण भावाच्या संपूर्ण खाचाखोचा माहिती असलेले गित्ते धनंजय मुंडे यांना भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. परळीच्या राजकारणात वजन असणारे गित्ते पवारांच्या गळाला कसे लागले?बबन गित्ते यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. जवळपास एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह बबन गित्ते सभास्थळी आले. त्यावरून गित्ते यांच्यामागे समर्थकांची मोठी झुंड असल्याचं स्पष्ट झालं. शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्याविरोधातील मोहरा म्हणून गीत्ते यांना ताकद देणार असल्याचं स्पष्ट केलं. परळीत सत्तेचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार होत आहेत. अशी सत्ता उलथवून टाकण्यासाठी लोक तयार होत असतात, असं म्हणत पवारांनी एकप्रकारे गीत्ते हेच धनुभाऊंना भिडणार असल्याचं अप्रत्यक्ष सांगितलं.

Who is Baban gitte who wants to contest Parli Vidhansabha against Dhananjay Munde ६

 

बबनराव गित्ते कोण आहेत?

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबन गित्ते वाढले. यांच्या पश्च्यात गित्तेंनी अनुक्रमे पंकजा आणि धनुभाऊंना साथ दिली. पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांबरोबर राजकारण केलं. पण पुढे तीव्र मतभेद झाल्याने ते धनुभाऊंच्या सोबतीला गेले. त्यांच्या संगतीनेच गित्तेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही. बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या. पत्नी सभापती असली तरी बबनराव काही कामे स्वत: करायचे. यामुळे त्यांच्यावर विविध आरोप झाले. पुढे काम करण्यात त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या. धनुभाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला. तिथेच धनंजय मुंडे आणि गित्ते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली.त्यानंतर बबन गित्ते यांच्यावर अनेक आरोप झाले. पुढे एका प्रकरणात त्यांना जेलवारी करावी लागली. मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायचा, असा निर्धार गित्ते यांनी केला. जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली. धनुभाऊ अजितदादांच्या सोबतीला गेले. हीच संधी साधून शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गित्ते यांनी फिल्डिंग लावली. आमदार क्षीरसागर यांच्या मदतीने त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली अन् आपला राष्ट्रवादीतला प्रवेश फिक्स केला.

धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढणार

साहेब म्हणतील ती पूर्व दिशा माझ्यासाठी असेल. ते सांगतील त्याप्रमाणे माझी पुढील वाटचाल असेल. मला निवडणूक लढवावी लागली तरी मी ती जबाबदारी पार पाडेन, असे सांगत धनुभाऊंविरोधातल्या लढ्याचा त्यांनी एकप्रकारे आगाजच केला. मुंडे बहीण-भावाच्या लढतीमध्ये गित्ते यांना पवारांकडून ताकद मिळेल, साहजिक ते विधानसभा निवडणूक लढतील. त्यामुळेच आता धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *