नाशिक: राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा गुरुवारपासून सुरू झालीय. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाकी टॉकीच्या मदतीने ऑनलाईन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबइझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती. या ठिकाणी हायटेक कॉपीचा प्रकार पोलीसांनी उघड केलाय.
म्हसरूळ भागातील वेबइझी इन्फोटेक याठिकाणी पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा सुरू असताना, परीक्षा केंद्राच्या परिसरात सकाळी १० वाजेच्या दरम्यान एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून वॉकीटॉकी, दोन मोबाईल, हेडफोन, सूक्ष्म श्रवणयंत्र आणि एक टॅब अस साहित्य ताब्यात घेण्यात आले.या संशयितांकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि टॅबमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे फोटो मिळून आले आहेत. हा संशयित त्या परीक्षाकेंद्रात नेमकी कोणाला मदत करत होता आणि या गैरप्रकारात अजून कोणी सहभागी आहे का? याचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून यामागे मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.
तलाठी भरतीच्या पेपरफुटी प्रकरणावर स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला. हजार रुपये परीक्षा शुल्क घेऊन पारदर्शक परीक्षा होतील अशी अपेक्षा असतांना हा धक्कादायक प्रकार झाल्याने कठोर कारवाईची मागणीही करण्यात आलीय. याबाबत कायदा व्हावा अशी अपेक्षाही स्पर्धा परीक्षेच्या संघर्ष समितीने केली आहे.एकीकडे अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षा खोळंबल्या होत्या. त्यात आता स्पर्धा परीक्षा घेण्यास मुहूर्त लागला पण त्यातच पेपरफुटीसारखा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडालीय. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर यामध्ये मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यताही वर्तवलीय. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय शासकीय पातळीवर या पेपर फुटी प्रकरणाची कशी दखल घेतली जाते याकडेही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.