मी लहानपणापासून ऐकले आहे की, बीड हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. सगळे जण शरद पवार यांचे वय काढतात, पण एका कवीने लिहून ठेवलय की, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विचार बाकी आहे, असे सक्षणा सलगर यांनी म्हणत अजित पवार गटाला टोला लगावला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची आज बीडमध्ये सभा झाली. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सक्षणा सलगर यांनी आक्रमक भाषण केले.
जनता ठरवेल
सक्षणा सलगर म्हणाल्या की, जे फलक लावतायात ना आमच्या माणसाला साथ द्या, आमचा माणूस कामाचा, आता कामाचा माणूस की लबाड हे जनता ठरवेल. लबाडाला हबाडा बीड जिल्हा देणार. भलेभले हबाडा घेऊन घरी बसणार आहेत, हे सांगण्यासाठी ही सभा आहे.
अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही
सक्षणा सलगर म्हणाल्या की, पवारसाहेब आम्ही तरुण मंडळी आहोत. हे रणांगण आहे. या रणांगणात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण का भारवला आहे? 65 वर्षाचा सह्याद्री आम्ही असा तसा रिटायर होऊ देणार नाही. निवडणूका येतात जातात, महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांना धडा शिकवला, तसाच महाराष्ट्र हा वीरांचा-शूरांचा आहे. या मातीतील माणूस कणखर आहे. हा स्वाभिमान, अस्मिता जपण्यासाठी पवारांना संधी द्यायची आहे, असे सक्षणा सलगर म्हणाल्या.
विचारांना साथ द्या
राजेश टोपे म्हणाले की, शरद पवारांनी नेहमी विचारांचे राजकारण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली आहे. तिचे जे मुळ आहे, समता बंधूत्व आणि न्याय या मुळ आधाराला फाटा देण्याचे काम सुरू आहे. शरद पवारांनी ज्या विचारधारेला धरुन ठेवले आहे तो विचार आपल्याला धरुन ठेवायचा आहे.शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला धरुन ठेवयाची आहे.