संसदेत भाषणादरम्यान केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना अविश्वास हा शब्द बोलता आला नव्हता. त्यावरून ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि संजय राऊत यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. ‘अविश्वास’ या शब्दावरून राणे आणि राऊत यांच्या शाब्दिक चकमकी घडल्या होत्या. त्यात आणखी एक भर पडली आहे. चिपळूण येथे उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केले होते. खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्याला होती. याच मेळाव्यातून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आणखी एक आव्हान देण्यात आलंय. तसेच, नारायण राणे यांच्यावर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली.
चिपळूण तालुक्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली. नारायण राणे हे गल्लीतले कार्ट आहे असा उल्लेख त्यांनी केला. ज्याला नीट मराठी बोलता येत नाही त्याला मंत्रिमंडळात घेऊन बसवले आहे अशी टीकाही त्यांनी केली.नारायण राणे केंद्रीय मंत्री आहे आणि त्याला अविश्वास हा साधा शब्दसुद्धा उच्चारता येत नाही. तो हा शब्द बोलूच शकत नाही. नीट उच्चार न करणारी माणसे मंत्रिमंडळात घेतल्यामुळे पक्षाची फडफड होत आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला.उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 27 ऑगस्टला हिंगोली येथे मेळावा होणार आहे. कुणी कोठेही गेले तरी शिवसेनेचा शिवसैनिक आमच्यासोबतच आहे. किती वेळा पक्ष फुटला तरी आम्ही पुन्हा जिद्दीने उभे राहिलो असे त्यांनी सांगितले.नारायण राणे यांनी तो शब्द नीट न उच्चारल्यामुळे त्याची जी काही उरलीसुरली होती ती गेली. आता त्यांना आम्ही एक आव्हान देतो. राणे यांनी देवेंद्र फडणवीस हा शब्द न चुकता उच्चारून दाखवावा आम्ही त्यांना 1 लाखाचे बक्षीस देऊ असे विनायक राऊत म्हणाले. 1 लाख बक्षिसाची रक्कम भास्करराव जाधव यांना तयार ठेवावी अशी सूचनाही विनायक राऊत यांनी यावेळी केली. रक्कम तयार ठेवा, पण ती देण्याची वेळ येणार नाही कारण तो देवेंद्र फडणवीस हा शब्द उच्चारूच शकणार नाही असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला.