सध्या देशात अन् राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी कधीच सुडाचे राजकारण केले नाही. ते तर प्रेमाचे राजकारण करत होते, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.दरम्यान जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही नवाब मलिक यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही. त्यामुळे ते निर्णय घेतील तो मान्य असेल. ज्या लोकांनी आज बीडमध्ये शरद पवार यांचे पोस्टर लावले मी त्यांचे आभार मानतो, त्यांनी शरद पवार बीडमध्ये येणार आहे हे सगळ्या महाराष्ट्राला सांगितले आहे. कारण त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कळवले की पवार साहेब येणार आहेत.
मृताच्या टाळूवरचे लोणी कोण खातंय?
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, CAG चा रिपोर्ट आला त्याने 7 मोठे घोटाळे समोर आणले आहेत. द्वारका एक्सप्रेसची कॉस्ट 14 टक्के कशी वाढली असा सवाल CAG ने केला?, आयुष्यमान भारत योजनेत अनेकांनी मोबाईल नंबर रजिस्टर करून भ्रष्टाचार केला, असा आरोप जयंत पाटील यांनी केला असून मयताच्या टाळूवरचे लोणी कोण खात आहे असा सवालही उपस्थित केला आहे.
महाराज दिल्लीपुढे झुकले नाही
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ज्यांची सुरुवात भ्रष्टाचाराला आळा घालण्याची होती त्याचा शेवट कसा होतोय हे आपण पाहतोय. स्वाभिमानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. महाराज दिल्लीपुढे कधीही झुकले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी करून स्वराज्य उभे केले. त्यांच्या चिरंजीवाने आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडून स्वराज्य टिकवण्याचा प्रयत्न केला असे सांगताना आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही असे स्पष्ट केले आहे.