पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी करावा- विजय पाटील निलंगेकर
(महाराष्ट्र महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण संपन्न)
निलंगा – आज सर्वच क्षेत्रात वाढत चाललेली स्पर्धा पाहता स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन पातळीवर त्यांना मिळालेले ज्ञान आणि संस्कार स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामी येतात. या स्पर्धेत सर्वांनाच यशाची प्राप्ती होईल असे नाही, तरी एक सुजाण नागरिक म्हणून आपण समाजाचे काही देणे लागतो त्यासाठी आपले ज्ञान आपल्यापुरते मर्यादित ठेवू नका. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच समाजाचा, राष्ट्राचा विकास होईल. असे मत महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.विजय पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले. ते निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्ञानाच्या कोणत्याही शाखेला कमी लेखू नये. त्या पदवीचा आपण अभिमान बाळगायला हवा. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव मा. श्री.बब्रुवानजी सरतापे यांची उपस्थिती होती.ते म्हणाले की, आपल्या आयुष्यात व्यक्तीला अनेक टप्पे पार करावे लागतात त्यातीलच हा एक टप्पा आपण पार केलेला आहे. प्राप्त केलेल्या ज्ञानाची समाजात देवाण-घेवाण केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी झाल्यानंतर सामाजिक आणि कौटुंबिक गोष्टींकडेही लक्ष द्यावे.
या पदवीप्रदान कार्यक्रमात कला, विज्ञान, वाणिज्य, संगणकशास्त्राच्या शाखेमध्ये पदवी प्राप्त केलेल्या २६९ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. संगणक शास्त्र विभागातून विद्यापीठात सर्वप्रथम आलेल्या कू.दिवे यशोदा राम, बी.व्होक. शाखेतून वेब प्रिंटिंग अँड टेक्नॉलॉजी यातून विद्यापीठात प्रथम आलेल्या कु. अश्विनी भीमराव हजारे, फूड प्रोसेसिंग विभागातून विद्यापीठातून प्रथम आलेली कु. रोहिणी सत्यवान शेळके, हिंदी विषयातून विद्यापीठात सर्वप्रथम आलेली कु. योगिता शिरुरे, अर्थशास्त्र विषयातून विद्यापीठात सर्वप्रथम आलेली कु.राऊतराव महादेवी व इंग्रजी विषयातून विद्यापीठात सर्वप्रथम आलेली कु. झरे दीपाली या विद्यार्थिनीचे मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा पर संदेशात आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी, समाज विकासासाठी करावा असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रमुख डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन डॉ.नरेश पिनमकर तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी मानले. यावेळी विचार मंचावर महाराष्ट्र ज्यू.कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. हंसराज भोसले, क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉ. विठ्ठल सांडूर यांची उपस्थिती होती.