काँग्रेसचे काही आमदार आमच्याकडे येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. नारायण राणेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, इंडिया आघाडीत 30 पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार एकत्र आले तर काय फरक पडणार आहे? ते तिघे होते, तरीही ते काही करू शकले नाहीत. तिघांचे दोघे झाले, तरीही काही करू शकले नाहीत. आता दोघांचे पुन्हा तीन झाले आहेत, पुढे चार होतील. पण त्यामुळे काहीही होणार नाही. आता काँग्रेसचेही काहीजण आमच्याकडे येतील, आम्ही सर्व पक्षाचे सरकार स्थापन करत आहोत.
शरद पवार कृषीमंत्री होणार की नाही हे मी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेच सांगू शकतील, असे महत्त्वपू्र्ण विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी केले. त्यांच्या या विधानामुळे शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.
गत काही दिवसांपासून राज्यात शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी यासंदर्भात एक सूचक विधान केल्यामुळे या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्याचे झाले असे की, पत्रकारांनी नारायण राणे यांना शरद पवार केंद्रात कृषीमंत्री होणार का? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर राणे एक क्षण थांबले अन् म्हणाले, हा माझा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेच यावर बोलतील.
काय सुरू होती चर्चा
काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या 11 आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहेत, आशा बातम्या गेली काही दिवस सुरू होत्या. अशोक चव्हाणांनी हे वृत्त फेटाळल्यानंतरही यावर अनेकदा चर्चा झाल्या यात त्यांच्या गटाला 4 मंत्रिपदेही मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपत तेव्हाच जावू शकलो असतो. काँग्रेसमधील माझ्या हितचिंतकांना माझे काँग्रेसमध्ये चांगले चाललेले पहावत नसेल. तेच लोक माझ्या भाजप प्रवेशाची चर्चा करतात. पण मी काँग्रेसमध्येच राहणार आहे.