पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून पुन्हा निवडून येण्यांसंबधीचे केलेले विधान अहंकाराने ओतप्रोत भरलेले आहे. भारतात नेता नव्हे तर जनता मोठी असल्याचे त्यांनी लक्षात घ्यावे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी मोदींवर निशाणा साधताना केली. जनतेने संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कुणाला कौल द्यायचा हा जनतेचा हक्क
मी पुन्हा लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवणार अशी भाषा करणारे नेते अहंकारी आहेत. आपल्या देशात नेता नाही, तर जनता मोठी आहे. कुणाला निवडून आणायचे व कुणाचा पराभूत करायचे हा जनतेचा हक्क आहे. जनतेने मोठमोठ्या नेत्यांना धूळ चारली आहे. त्यामुळे ही अहंकाराची भाषा चांगली नाही, असे नाना पटोले म्हणाले. ते येथील काँग्रेस मुख्यालयात (टिळक भवन) आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यात बोलत होते.
9 वर्षांत काय केले? ते सांगा
नरेंद्र मोदी मागील 9 वर्षांपासून सत्तेत आहेत. त्यांनी काँग्रेसला शिवीगाळ करण्याशिवाय दुसरे काय केले? हे सांगावे. मोदींना यापुढे काँग्रेसला दुषणे देऊन आपले अपयश लपवता येणार नाही, असे ते म्हणाले.
दररोज संविधानाची हत्या
देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेकांना बलिदान द्यावे लागले. त्याग करावा लागला. आपल्याला मोठ्या संघर्षानंतर स्वांतत्र्य मिळाले. पण ज्यांचा या लढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. ते दररोज संविधानाची हत्या करत आहेत. त्यामुळे संविधान व स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आपल्याला स्वातंत्र्याची आणखी एक लढाई लढावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
मोदींसारखा असंवेदनशील पंतप्रधान नाही
मणिपूर जळत आहे. त्यावर मोदींनी संसदेत एक शब्दही काढला नाही. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली. पण त्यावरही ते बोलले नाही. उलट काँग्रेसवर टीका करत हास्य विनोद करणारा असंवेदनशील पंतप्रधान देशाने पाहिला. देशाने हा धोका ओळखावा. भारताला महासत्ता बनवण्याचे काँग्रेसचे स्वप्न असून, ते पूर्ण करण्यासाठी तयार रहा, असे आवाहनही पटोले यांनी यावेळी केले.