महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा आपण दिला. आणि पीक विम्याला इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी दिला की, महाराष्ट्रामध्ये दीड कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन देशात एक रेकॉर्ड तयार केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूरमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 वा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आमच्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता सातत्याने राज्य सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहेत. ज्यांनी योग्य वेळेत कर्ज भरले त्यांना पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत आमचे देखील सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना विविध गोष्टी मागणीनुसार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे फडणवीस म्हणाले. या माध्यमातून मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला विहीर, मागेल त्याला पेरणी यंत्र अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना वार्ड बँकेच्या मदतीने आपण पहिला टप्पा पार केला असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये प्रत्येकाला घर देण्याचे संधी आपल्याला मिळाली आहे आणि त्या योजनेचा लाभ आपण घेतला पाहिजे, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या योजना आपण राबविण्यात यशस्वी होत असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
समृद्धी सारखा महामार्ग झाल्यानंतर नागपूर आणि विदर्भातील हा भाग देशाच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आकर्षित करण्यासाठी उपयोगी होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या भागातले चित्र बदलण्यासाठी या गोष्टीचा मदत होणार असल्याचा देखील त्यांनी सांगितले.