शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार भाजपत जाण्याचा निर्णय जवळपास झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी केला. शिंदे गटाचे आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय झाल्यासारखा आहे. यापूर्वीही शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर पुढे काय? याबाबत चर्चा झाल्या आहेत. त्यांच्यापुढे दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे गट स्थापन करणे आणि दुसरा म्हणजे दुसऱ्या एखाद्या पक्षात सहभागी होणे, असे ते म्हणाले.दरम्यान, एकनाथ खडसे पुढे बोलताना म्हणाले की, भाजपकडून निवडणूक लढविण्याचे तयारी करीत असणाऱ्यांची अडचण होणार आहे. पाचोरा येथील भाजपचे अमोल शिंदेंसारख्या अनेक इच्छुकांचे काय होणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नेमके खडसे काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपकडून निवडणूक लढविण्याचे तयारी करीत असणाऱ्यांची अडचण होणार आहे. पाचोरा येथील भाजपचे अमोल शिंदेंसारख्या अनेक इच्छुकांचे काय होणार? भाजपमध्ये गेले तर शिंदे गटातील आमदारांना फायदा होणार असल्याचेही सांगून भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याचेही खडसेंनी सांगितले. ते म्हणाले, आता भाजपमध्ये गेले तरच या आमदारांची अपात्रततेची कारवाई वाचू शकते. आज तरी भाजपात जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. मात्र भाजपकडून निवडणूक लढविण्याचे तयारी करीत असणाऱ्यांची अडचण होणार आहे. पाचोरा येथील भाजपचे अमोल शिंदेंसारख्या अनेक इच्छुकांचे काय होणार? सध्या तरी असे वाटते शिंदे गटाचे सर्व आमदार भाजपमध्ये जातील हे निश्चित.
नाव, पक्षचिन्हावरून अद्याप संभ्रम
शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हावरून शिंदे गट व ठाकरे गटात निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असेल, असा निर्णय दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाचे याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयही प्रलंबित आहे. असे असताना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
…तर भाजपकडून लढू
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले, तांत्रिक अडचण आली तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे निवडणूक चिन्ह कमळावर निवडणूक लढवू. आमचे सर्व निर्णय आमचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे घेतील. ते जसे सांगतील तसाच निर्णय आम्ही घेऊ. एकनाथ शिंदे यांनी उद्या सांगितले की, आपल्या सर्वांना अपक्ष निवडणूक लढायची आहे, तर आम्ही अपक्ष निवडणूक लढवू. एकनाथ शिंदेंनी सांगितले की, आपल्याला भाजपकडून लढायचं आहे, तर आम्ही भाजपाकडून लढू. आमचे सर्व निर्णय आमचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे घेतील. ते जसे सांगतील, तसेच सगळे होईल.