• Sat. Aug 16th, 2025

तुळजाभवानी एक्स्प्रेस लवकरच धावणार, नवीन रेल्वेस्थानके उभारले जाणार

Byjantaadmin

Aug 15, 2023

 उस्मानाबाद : सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले स्वप्न सत्यात उतरणार आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद -तुळजापूर या ३० किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५४४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा जारी करण्यात आली आहे.हा रेल्वेमार्ग ३० महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर अशी तीन नवीन रेल्वेस्थानके उभारले जाणार आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९मध्ये या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली होती,’ अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.आमदार पाटील म्हणाले, ‘सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद या ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असतील. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील ३२ गावांतील एक हजार ३७५ एकर जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उस्मानाबाद तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील १५ गावांमधील ४९४.२६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात आहे.’

रेल्वेमार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचे टप्पे पाडण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात बोगद्याची कामे हाती घेण्यात येतील. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी ४५२.४६ कोटी रुपयांच्या निधीला तत्काळ मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रेल्वेमार्ग पूर्णत्वाच्या टप्प्यावर आला आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी भारतीय रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत नवीन ब्रॉडगेज लाईन अंथरण्यासाठी गुरुवारी निविदा मागविण्यात आल्या. ३० किलोमीटर अंतरासाठी ५४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दहा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत या निविदा स्वीकारल्या जाणार आहेत.

तीन नवी रेल्वेस्थानके

उस्मानाबाद -तुळजापूर या ३० किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. उस्मानाबाद ते सांजा या दहा किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या १२ किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वेस्थानक, तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत. त्यात उस्मानाबाद येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. या मुख्य रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी नरेंद्र मोदी सरकारने नुकताच २१ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *