• Sat. Aug 16th, 2025

राज्यात पुढचे १० दिवस पावसाची स्थिती कशी असणार, मान्सूनचं कमबॅक कधी होणार, तज्ज्ञ म्हणतात…

Byjantaadmin

Aug 15, 2023
Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.

पुणे : मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये ब्रेक घेतला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील दहा दिवसांमध्ये पावसाच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. मध्य आणि पूर्व भागात मात्र पावसाची सध्याची स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज देखील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. स्कायमेट वेदर सर्विसेसचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी पुढील १० दिवसांमध्ये बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा आणि पूर्व मध्य प्रदेशात होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्रात कशी स्थिती राहणार?

जी. पी. शर्मा यांनी महाराष्ट्रात पुढच्या दोन आठवड्यांमध्ये मान्सून कमजोर राहू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईमध्ये देखील ही स्थिती राहू शकते, असं ते म्हणाले. महाराष्ट्र आणि दख्खनच्या पठारावर पुढील दहा दिवसांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डॉ. अक्षय देवरस यांनी मान्सूनचं पूर्ण क्षमतेनं कमबॅक ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस डोंगराळ भागत होऊ शकतो त्याशिवाय तो उत्तर आणि उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.संपूर्ण देशभरात १ जून पासूनच्या पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असता जी तूट आहे ती एलनिनो आणि वातावरणातील बदलत्या संरचनामुळं वाढू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सूनचा ब्रेक कायम राहू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात जुलै महिन्यात जोरदार पावसानं हजेरी लावली होती. जून महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं ब्रेक घेतलेला आहे. यामुळं राज्यातील विविध जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ६४ टक्के पाणी साठा आहे. नाशिक जिल्ह्यात गतवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे पावसाचं कमबॅक झालं नाही तर ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सोय आहे त्यांनी पिकांना पाणी द्यावं, असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत त्यांच्यापुढं मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *