निलंगा (प्रतिनिधी):-येथील पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान जवळपास सव्वानऊ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आली असून या निवासस्थानाचे लोकार्पण माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून होणार आहे.
जिल्हापरिषद इमारत बांधकामासाठी सहाय्यक अनुदान योजनेतून नऊ कोटी २५ लाख रूपये मंजूर झाला होता पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या जागेवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. यामध्ये एकूण चार विभागात हे बांधकाम करण्यात आले असून पहील्या विभागात चार, दुसऱ्या विभागात १६. तिसऱ्या विभागात चार तर चौथ्या विभागात दोन अशी एकूण २६ निवासस्थाने असून यामध्ये अधिकारी निवासस्थान व कर्मचारी असा समावेश आहे. शिवाय अतिशय उच्च व अधुनिक प्रतिचे हे निवासस्थाने असून गटविकास अधिकाऱ्यांचे स्वतंत्र निवासस्थान बांधले गेले आहे. निवासस्थाने पूर्ण होऊन बरेच दिवस झाले होते मात्र याचे लोकार्पण कधी होणार याबाबत उत्सूकता होती. अखेर स्वातंत्र्य दिनी या निवासस्थानाचे लोकार्पण माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसिलदार उषाकीरण शृंगारे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, जिल्हापरिषद बांधकाम उपअभियंता प्रकाश बोरफळे आदी उपस्थित राहणार आहेत. या नवीन अत्याधुनिक निवासस्थानामुळे वैभवात भर पडणार आहे.
पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचे उद्या माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या हस्ते लोकार्पण
