राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून भाजपने शरद पवार यांना मोठी ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या माध्यमातून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.
या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने या संबंधीची बातमी प्रकाशीत केली आहे.
शरद पवार-अजित पवारांच्या भेटीगाठी वाढल्या
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यात आता गुप्त बैठकीची माहिती समोर आल्याने या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. अजित पवार सोबत आले की, शरद पवार देखील येतील, असा विश्वास भाजपला होता. मात्र, अद्याप शरद पवार यांनी तसा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना आता या दोन मोठ्या पदांच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.