• Thu. Aug 14th, 2025

अमित शहांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील नेतृत्व बदलण्यासाठी गुप्त खलबते, त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे आजारी- ठाकरे गट

Byjantaadmin

Aug 14, 2023

चार दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले व त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाली. ही गुप्त बातमी फुटल्यानेच मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

शिंदेंची भीतीने झोप उडाली

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज म्हटले आहे की, अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळ्यात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल करू, असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले. शिंदे हे 24 तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे 24 तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास 24 तास काम करणे असे म्हणता येत नाही.

दादांमुळे शिंदे गटाच्या हृदयाचे ठोके वाढले

ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटले आहे की, शिंदे यांची झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातीलत्यांच्या शेतावर आराम करतात. म्हणजे ‘24 तास काम व पुढचे 72 तास आराम’ असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते व शिंदे यांच्या आजाराचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले जाते. अजित पवार सरकारात घुसल्यावर शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले. त्यात अजित पवार हे अधूनमधून शरद पवारांना भेटू लागल्याने या सगळय़ांच्याच लहान मेंदूस त्रास सुरू झाला, पण त्यासाठी दूर साताऱ्यात जाऊन सततच आराम करणे हा उपाय नाही.

उपऱ्यांच्या पखाली वाहत आहेत

ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटले आहे की, शिंदे गटाने त्यांच्या नेत्यास तत्काळ मुंबई-ठाण्यातील इस्पितळात दाखल करून उपचार सुरू केले पाहिजेत. शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे साताऱ्यात जाऊन गावठी उपचार, जडीबुटी, जादूटोणा, बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार करून घेणे योग्य नाही. आरोग्य हीच संपत्ती आहे व त्या संपत्तीचे रक्षण खोक्यांनी होत नाही. दुसरे असे की, मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्मास आलेले नाही. ‘मी पुन्हा येणार’वाल्यांनाही ‘उप’ वगैरे होऊन उपऱ्यांच्या पखाली वाहाव्या लागत आहेत, पण शिंदे यांना वाटते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपणच, पण अजित पवारांमुळे त्यांच्या श्वासनलिकेत अडथळे निर्माण झाले व त्यांना अलीकडे गुदमरल्यासारखे होत आहे.

त्या आजाराचा किडा मुख्यमंत्र्यांच्या शरीरात

सामनात उपरोधाने म्हटले आहे की, शिंदे यांची प्रकृती चिंता करावी अशी आहे हे आमदार शिरसाटांचे म्हणणे खरे असेल तर त्यांना लगेच अतिदक्षता विभागात दाखल करून पुढचे उपचार करावे लागतील व त्यांच्या आसपास अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना फिरकू न देण्याची काळजी घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणास सध्या ज्या आजाराने ग्रासले आहे, त्या आजाराचा किडा मुख्यमंत्र्यांच्या शरीरात असून त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर हा किडा महाराष्ट्राचे समाजमन पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही.

आजाराचे लवकर उच्चाटन हवे

सामनात म्हटले आहे की, अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱयातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्रास लागलेला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारांत गुप्त असे काहीच राहिलेले नाही. खरे तर हा रोग महाराष्ट्राला लागला आहे व अशा रोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होईल तेवढे बरे. अनेक आजारांनी सध्या महाराष्ट्र कृश व जर्जर झाला आहे. त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करीत आहेत. दोन पवारांची ‘गंमतभेट’ व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही हे आम्ही परखडपणे बजावत असल्याची भूमिका ठाकरे गटाने मांडलीआाहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *