संभ्रम वगैरे काही नाही, महाविकास आघाडीमध्ये विचारांनी सर्व एकत्र आहेत. देशात आणि राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संबंधित घटकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याला काहीही कारण नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. आमची ही भूमिका स्पष्ट झाली असून त्याविषयी आमचा संबंध राहिलेला नाही. एकदा ही गोष्ट स्पष्ट केली आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या बातम्या करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन शरद पवारांनी केले.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष विचाराने एकत्र आलेले आहोत. भाजपशी संबंधित जे आहे, त्या घटकांशी आमचा कोणत्याही प्रकारे सहभाग नाही, ही भूमिका स्पष्ट झाली असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. महाविकास आघाडीमध्ये एकी असून कोणत्याही मतभेद नाही. माझ्या आणि अजित पवार यांच्या भेटीवर मी कालच भूमिका स्पष्ट केली आहे. वारंवार प्रश्न विचारून त्याविषयी संभ्रम निर्माण करू नका, असे देखील ते म्हणाले.
I.N.D.I.A.च्या बैठकीची जबाबदारी
सामना मध्ये कोणी काय लिहिले, त्याच्याशी काही घेणे देणे नाही. हे माझे मत आहे की, त्यांचे मत आहे. मी माझे मत स्पष्टपणे मांडले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. आगामी काळात महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या I.N.D.I.A. च्या बैठकी संदर्भातली जबाबदारी मी स्वतः, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. आम्ही ती भूमिका उत्तम रित्या पार पाडू आणि ही बैठक यशस्वी होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. या संदर्भातल्या आमच्या आगामी काळात बैठक होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न
अजित पवार आणि माझ्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आली असल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना अशाप्रकारे मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, मला खात्री आहे की, विचारांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट आहे. असे म्हणत शरद पवार यांनी जयंत पाटील भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांना मदत करा
दुष्काळी भागात पाऊस नाही. बारामतीतही टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी लोक छावण्यांची मागणी करत आहेत. पाऊस नाही. काही ठिकाणी पेरण्या झाल्या. तिथे शेतकऱ्यांसमोर दुबारपेरणीचे संकट आले आहे. याकडे राज्य सरकारने गंभीरपणे पाहावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले.
टोमॅटो आयात करणे चुकीचे
टोमॅटोचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असताना नेपाळकडून केंद्र सरकार टोमॅटो खरेदी आयात करत आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत असताना परदेशातून टोमॅटो आणण्याच्या सरकारच्या भूमिकेवर त्यांनी टिका केली. शेतकरी उत्पादक आहे, त्याला दोन पैसे जास्त मिळत असतील तर त्याच्या पाठी उभे राहण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखीत केली. अशा प्रकारे टोमॅटो आयात करणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.