केंद्रीय गृहमंत्रीAmit Shah यांनी रविवारी (13 ऑगस्ट) रोजी इंडिया (INDIA) आघाडीवर निशाणा साधत म्हटलं की, ‘विरोधकांची एकजूट म्हणजे जुन्या बाटलीमध्ये जुनी दारु.’ तसेच त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवरही गंभीर आरोप यावेळी केले आहेत. ’12 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांचा हा गट असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.’ अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवरही जोरदार घणाघात केला आहे. ‘काँग्रेसच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ही अकराव्या स्थानापासून कधी वर गेली नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानावर पोहोचवली आहे,’ असं म्हणत अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील मनसा शहरात नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या प्रादेशिक केंद्राची पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित देखील केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी एनडीएविरोधात 26 विरोधी पक्षांनी एकजूट करुन इंडिया ही आघाडी तयार केली आहे.
विरोधी पक्षांवर अमित शाह यांचं टीकास्त्र
अमित शाह यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, ‘युपीए आणि काँग्रेस म्हणजे 12 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेल्या नेत्यांचा गट आहे.’ ज्यांनी 12 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे त्यांना कोण मत देणार,’ असा सवाल देखील अमित शाह यांनी उपस्थित केला आहे.
‘इथे बाटली आणि दारु दोन्ही जुनं’
अमित शाह यांनी जहरी शब्दांत विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘तुम्ही नव्या बाटलीमध्ये जुनी दारु ही म्हण तर ऐकली असेलच. पण इथे तर बाटली आणि दारु दोन्हीही जुनंच आहे. त्यामुळे या ठगांचे बळी तुम्ही पडू नका.’ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी गुजराती भाषेविषयी देखील भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘आम्ही इंग्रजीच्या विरोधात नाही, पण गुजराती भाषेला जिवंत ठेवणं हे आपलं काम आहे. जर आपण आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करुन नाही दिली तर आपणच आपली संस्कृती लुप्त करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहोत.’