• Tue. Aug 12th, 2025

शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारात मात्र आरोग्य सुविधांचा अभाव – जयंत पाटील

Byjantaadmin

Aug 13, 2023

ठाणे महापालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयात शुक्रवारीच पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आता एका रात्रीत या रुग्णालयात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच ठाणे जिल्ह्यातील पालिका रुग्णालयांमधील अनागोंदी कारभार समोर आला आहे.यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये रात्रभरात तब्बल 17रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारात मात्र आरोग्य सुविधांचा अभाव आहे. हॉस्पिटलमध्ये पुरेशा आरोग्याच्या सुविधा नाहीत, डॉक्टर्स नाहीत, स्टाफ नाही त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहाजिकच मर्यादा येतात. त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतोय. लोकांचे नाहक जीव जात आहेत. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे असे ट्विट करत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील आरोग्य यंत्रणा सपशेल फेल झाली आहे. गतिमान कारभाराचा ढोल बडवणाऱ्या शिंदेंच्या ठाण्यात कळवा हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर गेले आहे. हॉस्पिटल रुग्णांनी ओव्हरपॅक झाले असून 300 कर्मचाऱ्यांची भरतीच न झाल्यामुळे रुग्णांवर उपचार होणार कसे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या रुग्णालयावर दरवर्षी शंभर कोटी रुपये खर्च होऊनही सुविधांच्या नावाने बोंब आहे. 500 रुग्ण क्षमता असलेल्या या रुग्णालयात 600 रुग्ण कोंबून भरती केले आहेत. त्यामुळे औषधोपचार मिळण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

आव्हाडांनी व्यक्त केला संताप

ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत संपूर्ण रुग्णालयाचेच ऑडिट करून ते ऑडिट जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

…तर ही घटना घडली नसती

जितेंद्र आव्हाड यांनी आज रुग्णालयाला भेट दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *