शिंदे गटाचे 15 आमदार नाराज आहेत, येत्या काळात हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील, पण त्यांना उद्धव ठाकरे घेतील का हा प्रश्न आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. रोहित पवारांनी तुळजापूरमध्ये येऊन भवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. जे आम्हाला सोडून गेले, त्यांच्याबाबत जनतेनेच निर्णय घेतला पाहिजे. पक्षाचा विचार संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि भाजपसोबत गेलेल्यांना आमच्यामुळे त्रास होईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
जनतेचे प्रश्न सोडविणे गरजेचे
रोहित पवार म्हणाले की, सध्या राज्यातील शैक्षणिक आणि राजकीय परिस्थिती खालच्या पातळीवर गेली आहे, याला भाजपच जबाबदार आहे.पण सध्या नेत्यांमधील नाराजीबाबत चर्चा होत आहेत. कोण नाराज आहेत, कुणाच्या बैठका सुरु आहेत, यापेक्षा महाराष्ट्रातील जनता का नाराज आहे, हे पाहणे गरजेचे आहे, त्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. नेत्यांनी एकमेकांवर नाराज राहण्यापेक्षा, लोकांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे,
गड सांभाळण्याची जबाबदारी
अजित पवारांसोबत गेलेल्या धनंजय मुंडे यांच्या होमपीचमध्ये होणाऱ्या सभेकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील युवा पिढीला पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाठी रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील पदधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गड सांभाळण्याची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर आली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी महेंद्र धुरगुडे यांच्याकडे आहे.