भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना सध्या धक्यावर धक्के बसत असून गेल्या दोन महिन्यांत जवळच्या सात जणांनी त्यांची साथ सोडली. तर अजूनही काहीजण त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावरच अनेकांनी ज्योतिरादित्य शिंदेंची साथ सोडल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मध्य प्रदेशातील विविध भागातील ज्योतिरादित्य शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे समंदर पटेल यांनीही शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपसोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शिंदेंचे बहुतांश समर्थक हे ग्वाल्हेर-चंबळ भागातील असून ग्वाल्हेर-चंबळ हा भाग शिंदे राजघराण्याचा बालेकिल्ला मानला जातो.आगामी निवडणुका पाहता ज्योतिरादित्य शिंदेंच्या समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे आपल्या समर्थकांना का रोखू शकत नाहीत, असा प्रश्नही आता उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यात काँग्रेसने शिंदेंच्या जवळपास सात समर्थकांना फोडल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.ज्या शिंदेंच्या समर्थकांनी BJPला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्याबाबत स्पष्टीकरण देताना जे भाजपला सोडून गेले, त्यांच्याकडे कोणताही जनाधार नसल्याचे सांगितले जात आहे. तर माजी आमदार आंदलसिंग कंसाना यांचीही काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ज्योतिरादित्य शिंदेंची साथ सोडलेले नेते कोणते?
समंदर पटेल : पटेलांनी यांनी २००८ मध्ये जावदमधून अपक्ष म्हणून लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना यश आले नव्हते. ज्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये सामील झाले, तेव्हा त्यांच्या समवेत ते सामील झाले होते.
राकेश गुप्ता : गुप्ता हे शिवपुरीमध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदावर होते. ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असताना गुप्ता यांना जिल्ह्याचे कार्याध्यक्ष करण्यात आले होते. गुप्ता हे शिवपुरीमध्ये शिंदेंच्या निवडणूक व्यवस्थापनाचे काम पाहत असत.
गगन दीक्षित : दीक्षित हे शिंदे फॅन्स क्लबच्या जिल्हाध्यक्षपदावर होते. दीक्षित यांच्याबरोबरच सांची जनपद पंचायत अध्यक्षा अर्चना पोरते यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
बैजनाथ सिंह यादव : ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे बैजनाथ सिंह यादव यांनी जूनमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बैजनाथ यादव यांच्या पत्नी कमला यादव या शिवपुरी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आहेत.
रघुराज धाकड : धाकड हे कोलारस येथील असून ते तब्बल २० वर्षांपासून राजकारणात आहेत. धाकड समाजातील खंबीर नेते म्हणून रघराज यांच्याकडे पाहिले जाते.
जयपाल सिंह यादव : यादव यांचीही ज्योतिरादित्य शिंदेच्या खास समर्थकांमध्ये गणना होते. त्यांनी चंदेरीमधून निवडणूक लढवली होती. काही दिवसांपूर्वीच यादव आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
यदुराज सिंह यादव : चंदेरीमध्ये यदुराज सिंह यादव यांची मजबूत पकड असून त्यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. मात्र, त्यांनीही काही दिवसांपूर्वीच CONGRESS मध्ये प्रवेश केला.