• Tue. Aug 12th, 2025

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली, भाजपसोबत जाणार नाही म्हणत शरद पवारांकडून संकेत

Byjantaadmin

Aug 13, 2023

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत काल झालेल्या भेटीवर देखील भाष्य केलं. कालच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवारांनी आज बोलताना पक्षातील सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यामध्ये परिवर्तन व्हावं यासाठी हितचिंतकांचे प्रयत्न सुरु असून ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हटलं.

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांचं मन वळवण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून प्रस्ताव देण्यात आल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, शरद पवारांनी आज बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं पक्षाच्या राजकीय धोरणात भाजपसोबत युती शक्य नसल्याचं म्हटलं. त्यासोबतच त्यांनी हितचिंतकांचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं. हितचिंतक आमच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेत परिवर्तन करता येईल का यासाठी प्रयत्न करत असल्याचं शरद पवार म्हणाले.अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीसंदर्भात पुन्हा एकदा पत्रकारांनी विचारलं असता शरद पवार यांनी आम्ही एकत्र असो किंवा होता पुढं एकत्र असू त्यावेळी देखील भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही असं म्हटलं. मात्र, यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे दोन गट पडले ते आगामी काळात एकत्र येऊ शकतात, असे संकेत शरद पवारांनी दिल्याच्या चर्चा सुरु आहेत.

राहुल गांधी यांचं निलंबन रद्द झाल्याचा संदर्भ देत पंतप्रधान पदावरुन इंडिया आघाडीत वाद होईल का? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी असा वाद होणार नाही असं स्पष्ट केलं. इंडिया आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद असल्याचं शरद पवार म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार असून ३० ते ४० नेते उपस्थित असतील, असं शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *