• Sat. Aug 9th, 2025

लातूर जिल्‍हयाच्‍या न्‍याय हक्‍कासाठी सरकारचे लक्ष वेधणार जनजागर मंचच्‍या माध्‍यमातून माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची ग्‍वाही

Byjantaadmin

Aug 12, 2023

लातूर जिल्‍हयाच्‍या न्‍याय हक्‍कासाठी सरकारचे लक्ष वेधणार जनजागर मंचच्‍या माध्‍यमातून माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची ग्‍वाही

लातूर प्रतिनिधी:-लातूर जिल्‍हयाने विविध क्षेत्रामध्‍ये आपला ठसा उमटवत देश पातळीवर नावलौकिक मिळेविलेला आहे. जिल्‍हा या वेगवेगळया क्षेत्रामध्‍ये सक्षम असलातरी असुन काही क्षेत्रामध्‍ये अधिकचे काम होऊन जिल्‍हयाचे भविष्‍य उज्‍वल करण्‍यासाठी सामाजिक जनजागृती आणि सरकार दरबारी पाठपुरावा आवश्‍यक आहे. याकरीताच जनजागर विचार मंचच्‍या माध्‍यमातून आपण चर्चासत्र करत जिल्‍हयाच्‍या विविध ९ क्षेत्राची श्‍वेतपत्रिका तयार करीत आहोत. या श्‍वेतपत्रिकेसाठी असणारा पहिला टप्‍पा पूर्ण होत असुन यामधुन जिल्‍हयाच्‍या उदयाच्‍या उज्‍वल भविष्‍यासाठी पाणी शिक्षण आणि रोजगार या तीन मुख्‍य क्षेत्रातून न्‍यायहक्‍काच्‍या मागण्‍या समोर आलेल्‍या आहेत. या न्‍यायहक्‍कासाठी जनजागृती करून सरकारचे लक्ष वेधणार अशी ग्‍वाही माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

लातूर जिल्‍हयाच्‍या उज्‍वल भविषयासाठी आणि शाश्‍वत विकासाकरीता माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या पुढाकारातून जनजगार मंच हे अराजकीय व्‍यासपीठ स्‍थापन करून जनजागर संवादाचे आयोजन करण्‍यात आलेले होते. लातूर येथील दयानंद सभागृहात आयोजित जनजागर संवादात कृषि, शिक्षण आणि कौशल्‍य विकास, उदयोग आणि रोजगार, महिला आणि बालकल्‍याण , आरोग्‍य, पाणी व्‍यवस्‍थापन, पर्यावरण, समाजकल्‍याण आणि सुरक्षा व कला साहित्‍य या ९ क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍तींच्‍या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र आयोजित करण्‍यात आलेले होते. या चर्चासत्राच्‍या अंती या प्रत्‍येक क्षेत्राच्‍या विकासाकरीता श्‍वेतपत्रिका तयार होणार आहे.त्‍याचबरोबर या विकासासाठी न्‍याय मागण्‍या व हक्‍क मिळविण्‍याकरीता शासन दरबारी प्रयत्‍न होणार आहे. या चर्चासत्राचा समारोप करताना माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते.

लातूर जिल्‍हा ज्ञानाची खाण असलेतरी येथे ज्ञान प्राप्‍त करणा-या तरूणांना रोजगारासाठी स्‍थालांरीत व्‍हावे लागते ही निश्चितच जिल्‍हयासाठी खंताची बाब असुन हे स्‍थलांतर रोखण्‍याकरीता जिल्‍हयात रोजगाराचे साधन उपलब्‍ध होणे आवश्‍यक आहे. हे साधन उपलब्‍ध होणेकरीता जिल्‍हयाला हक्‍कांचे पाणी मिळुन त्‍यांचे योग्‍य व्‍यवस्‍थापन होणे आवश्‍यक आहे. या बाबी पूर्ण झाल्‍यास निश्चितच लातूर केवळ देशातच नव्‍हे तर जगात आपला नावलौकिक करेल असा विश्‍वास माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. मात्र जिल्‍हयाला त्‍याचे हक्‍काचे पाणी आणि शिक्षणक्षेत्रासाठी आवश्‍यक असणारी यंत्रणा उपलब्‍ध होणे तितकेच गरजेचे आहे. जनजागर मंचच्‍या माध्‍यमातून आज जी चर्चा झाली त्‍या चर्चाअंती शिक्षण, रोजगार आणि पाणी या तीन विषयात अधिकचे काम होणे अपेक्षित असल्‍याचे समोर आलेले आहे. ज्‍या लातूर जिल्‍हयातून दरवर्षी दोन हजारांपेक्षा अधिक डॉक्‍टर उपलब्‍ध होतात त्‍या लातूर जिल्‍हयाच्‍या एम्‍स सारखे वैदयकीय विदयापीठ उपलब्‍ध होणे हक्‍क आहे त्‍याचबरोबर कौशल्‍य विदयापीठ आणि केंद्रीय विदयापीठही लातूर होणे अपेक्षित असल्‍याचे यातून स्‍पष्‍ट झालेले आहे. या सारखी विदयापीठे उपलब्‍ध झाल्‍यास लातूर जिल्‍हयाच्‍या शिक्षणाचा अधिकचा नावलौ‍किक होऊन या विदयापीठाच्‍या माध्‍यमातून रोजगाराची संधी उपलब्‍ध होणार आहे. त्‍याच बरोबर लातूर जिल्‍हयाला गेल्‍या अनेक वर्षापासून पाण्‍याचा प्रश्‍न भेडसावत असलातरी आता पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय झालेली आहे. मात्र सिंचन क्षेत्र वाढून कृषि क्षेत्र अधिक विकसित होण्‍याकरीता जिल्‍हयाला हक्‍काचे पाणी उपलब्‍ध होणे आवश्‍यक असल्‍याचे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यावेळी सांगितले आहे. वाहुन जाणारे ९० टीएमसी पाणी मराठवाडयाला देण्‍याचा निर्णय शासनाकडुन होत असला तरी हे पाणी देतानाच प्रत्‍येक जिल्‍हयाचा वाटा ठरविणे आवश्‍यक असल्‍याचे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. प्रत्‍येक जिल्‍हयाला पाण्‍याचा वाटा ठरवून दिल्‍यानंतर लातूर जिल्‍हयाच्‍या वाटयाला येणा-या पाण्‍यातून जिल्‍हा अधिक सुजलम सुफलाम होईल याकरीता योग्‍य पाणी व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी या मंचच्‍या माध्‍यमातून जनजागृतीही करण्‍यात येणार आहे. मात्र शासन दरबारी आपल्‍या हक्‍काचे पाणी मिळविण्‍यासाठी सरकारचे लक्ष वेधण्‍याकरीता आपली एकजूट दाखविणे गरजेचे असल्‍याचे सांगून याकरीता आगामी काळात अनेक उपक्रमही राबविणे आवश्‍यक असल्‍याचे मत माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

आगामी गणेश उत्‍सावाच्‍यया काळात लातूर जिल्‍हयाच्‍या मागण्‍यासंदर्भात अधिकचे जनजागरण करण्‍यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेण्‍याचे आवाहन करून माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी गणेश उत्‍सावात या संदर्भातले देखावेही उभा करावेत अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. त्‍याचबरोबर जिल्‍हयाच्‍या न्‍याय हक्‍क मिळविण्‍याकरीता सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी आगामी काळात २५ हजारापेक्षा अधिक मोटर सायकलची रॅली लातूर ते तुळजापूर काढण्‍यात येईल अशी घोषणा करून जोपर्यंत लातूर जिल्‍हयाच्‍या न्‍याय मागण्‍या व हक्‍क मिळणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असा विश्‍वास देवून याकरीता जिल्‍हयातील जनतेने आपल्‍याला साथ दयावी असे आवाहन केले. जिल्‍हयाच्‍या विकासाकरीता माजीमुख्‍यमंत्री कर्मयोगी स्‍व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर, स्‍वर्गीय विलासराव देशमुख व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्‍यासह ज्‍यानी ज्‍यानी योगदान दिले ते निश्चितच आमच्‍यासाठी आदर्शच होते. मात्र सामाजिक बांध‍लिकी जोपासत या जिल्‍हयाचे आपणही काही तरी देणे लागतो या भावनेतून आगामी काळात जनजागर मंचच्‍या माध्‍यमातून आपण काम करणार असल्‍याचा विश्‍वास देवून याकरीता सदैव प्रयत्‍नशिल राहिल अशी ग्‍वाही माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिली.

जनजागर मंचच्‍या माध्‍यमातून लोकसभागातून जी चर्चा जिल्‍हयाच्‍या विकासासाठी झाली आहे. ती आम्‍हालाही प्रशासनस्‍तरावर मार्गदर्शक ठरेल असा विश्‍वास व्‍यक्‍त करून जिल्‍हाधिकारी श्रीमती.वर्षा ठाकुर-घुगे यांनी लातूर जिल्‍हा हा अधिक विकसित होण्‍याकरीता या मंचच्‍या माध्‍यमातून जी श्‍वेतपत्रिका तयार होईल आणि ज्‍या मागण्‍यां पुढे येथील त्‍या पुर्ण करण्‍यासाठी आपण प्रयत्‍नशील राहू अशी ग्‍वाही त्‍यांनी यावेळी दिली. लातूर जिल्‍हा हा अनेक क्षेत्रात राज्‍य व देशासाठी दिशादर्शक असलातरी यामध्‍ये आणखीन सुधारणा होणे अपेक्षित असल्‍याचे स्‍पष्‍ट झालेले असुन याकरीता लोकसहभाग आणि राजकीय इच्‍छा शक्‍ती असेल तर प्रशासनालाही त्‍या अनुषंगाने काम करता येईल. असे सांगून आगामी काळात हा मंच जिल्‍हयाच्‍या विकासाला नवीन दिशा देईल असे मत व्‍यक्‍त केले.

यावेळी निरीक्षक म्‍हणुन उपस्थित असलेले जेष्‍ठ पत्रकार प्रदिप नणंदकर यांनी यापूर्वीही लातूर जिल्‍हयाने अनेक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून जिल्‍हयाचे नावलौकिक केले असल्‍याचे सांगितले. मात्र काळाच्‍या ओघात हे प्रयोग पडदयाआड गेलेले असुन पुन्‍हा एकदा माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या पुढाकारातून जिल्‍हयाच्‍या विकासाला नवी दिशा प्रयोग या मंचच्‍या माध्‍यमातून होत असल्‍याबददल विशेष कौतुक केले मात्र यासाठी आगामी काळातही पाठपुरावा होवून त्‍याची फलश्रृती प्राप्‍त व्‍हावी अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली याकरीता माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर निश्चितच प्रयत्‍न करतील असा विश्‍वासही व्‍यक्‍त केला.

यावेळी व्‍यासपीठावर रविंद्र पाठक, अजित पाटील कव्‍हेकर, अॅड.शैलेश गोजमगुंडे, प्रेरणा होनराव,उदय पाटील,डॉ.संतोष वाघमारे, रामलिंग शेरे, डॉ.लालासाहेब देशमुख, यांच्‍यासह निरीक्षकम्‍हणुन जेष्‍ठ पत्रकार प्रदिप नणंदकर, संपादक अशोक चिचोंले, विवेक सौताडीकर, राम जेवरे, हरी तुगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या चर्चासत्रासाठी वेगवेगळया ९ क्षेत्राकरीता एकुण ५७८ सदस्‍यांनी नोंदणी केली होती. चर्चासत्राचा शुभारंभ भारतमातेच्‍या पुजनाने तर समारोप राष्‍ट्रगीताने करण्‍यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *