येणाऱ्या सर्व निवडणुकांच्या तयारीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची नव्याने बांधणी सुरू केली आहे. यासाठी सहा संपर्कप्रमुखांची नियुक्ती केली असून सध्या हे पदाधिकारी विविध सर्वेक्षण, माहिती, सैनिकांचे विचार जाणून घेत आहेत.सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी बुथप्रमुख, शाखाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुत्या केल्या जात आहेत. सध्या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत शिवसेनेचे सैनिकांसोबत संपर्क अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लातूर येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
जनतेमध्ये शिवसेनेला मोठी सहानुभूती मिळते आहे. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन झाली होती. ते भगवे वादळ बघता बघता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पसरले होते. तिच परिस्थिती मला सध्या मराठवाड्यात दिसते आहे, असे सांगत माजी खासदार खैरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पुढील काळ निवडणुकांचा आहे, हे ओळखून गाव तेथे शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले.
कालच्या बैठकीमुळे आम्हा पदाधिकाऱ्यांना नवे बळ मिळाले आहे. या प्रेरणेतूनच काही दिवसांत जिल्हाभर पक्षाची नव्याने बांधणी होईल. तसेच बुधप्रमुख, शाखाप्रमुखांच्या नियुक्त्यांवरही लवकरच शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती सह संपर्कप्रमुख संतोष सोमवंशी यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मूळ शिवसेनेसोबत दगा झाला आहे. ही बाब शिवसैनिकांनी चांगलीच मनावर घेतली आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आहे. आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनीही मोर्चा आणि सभांचा धडाका लावला आहे. त्यांना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कारण सोडून गेले ते सर्व मोहापायी गेले आहेत. पण मूळ शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, हे कार्यकर्त्यांना पटवून देण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम यशस्वी झाली आहे.
फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला आहे. याचा धसका सत्ताधाऱ्यांनी घेतला असल्याचेही shivsena नेते सांगतात udhav thakre यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा sharad pawar यांच्यासोबतही दगा झालेला आहे. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते पेटून उठले आहेत आणि सोबतीला महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष कॉंग्रेस आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीचे निकाल आघाडीच्या बाजुने लागतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.