आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या स्वप्नपुर्तीसाठी जनजागर संवाद
लातूर/प्रतिनिधी ः- विविध क्षेत्रात आघाडीवर असणारा लातूर जिल्हा विकासाबाबत कायमच पिछाडीवर राहतो. हे असे का होते ? याची कारणे शोधून जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्यासाठी जनजागर मंचच्या पुढाकारातून जनजागर संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत दयानंद सभागृहात हे चर्चासत्र संपन्न होणार आहे.
हे एक अराजकीय व्यासपीठ आहे.या माध्यमातून एक सामूहिक चळवळ उभारण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतला आहे.जिल्ह्याच्या विकासाची तळमळ असणारे राजकीय पक्ष, विविध संस्था- संघटना आणि सामान्य नागरिकांनाही यात सहभागी होता येणार आहे.
लातूर जिल्ह्याचा विविध क्षेत्रात,राज्य व देश पातळीवर लौकिक आहे. राजकीय नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याच्या लौकिकात भरच घातलेली आहे. शिक्षणाचा लातूर पॅटर्न तर देशात विख्यात असून ज्ञानाची खाण म्हणूनच लातूरला ओळखले जाते. ज्ञान, कर्तृत्व आणि कष्टाचाही लातूरला वारसा आहे. असे असले तरी अद्यापही जिल्ह्याचा शाश्वत विकास झालेला नाही. त्यामुळेच या जनजागर संवादाच्या माध्यमातून हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शनिवारी विविध नऊ विषयावर तज्ञ मंडळी या संवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. यातून जिल्ह्याच्या विकासासाठी श्वेतपत्रिका तयार केली जाणार आहे. त्या आधारे धोरणात्मक निर्णय व्हावेत असा प्रयत्न केला जाणार आहे.या संवादात कृषी, शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योग आणि रोजगार, महिला आणि बालकल्याण,आरोग्य, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण, समाज कल्याण आणि सुरक्षा तसेच कला आणि साहित्य या विषयावर मंथन होणार आहे.त्या- त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यातून बाहेर येणार्या विषयासंदर्भात धोरणात्मक निर्णय ठरवण्यासाठी मंचच्या माध्यमातून पुढच्या टप्प्यात प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सर्व अभिनिवेश बाजूला ठेवून विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते,संस्था आणि संघटनांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंचच्या वतीने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या स्वप्नपुर्तीसाठी जनजागर संवाद
