• Sat. Aug 9th, 2025

युती तुटली तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते, ते कोणत्याही चर्चेत नव्हते; एकनाथ खडसे यांची तिखट टीका

Byjantaadmin

Aug 10, 2023

शिवसेनेसोबतची युती तुटली तेव्हा भाजप नेते गिरीश महाजन अर्ध्या चड्डीत फिरत होते, अशी तिखट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी महाजनांवर शरसंधान साधताना केली आहे.

शिवसेना-भाजपची युती उद्धव ठाकरे यांनीच तोडली होती, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांच्या बैठकीत केला होता. त्यावर संमिश्र प्रतिकिया उमटत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनीही मोदींच्या या दाव्याची पाठराखण करत युती तुटण्याचे खापर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना – भाजप युती तुटली तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते. तेव्हा ते कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हते. त्यांना तेव्हा दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीला बोलावले जात नव्हते. त्यावेळी भाजपची सर्व सूत्रे विरोधी पक्षनेता म्हणून मी व देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. त्यामुळे मधल्या कोणत्याच गोष्टी महाजन यांना माहिती नव्हत्या. त्यामुळे त्यांनी किमान माहिती घेऊन तरी बोलावे, असे ते एकनाथ खडसे गुरुवारी गिरीश महाजनांवरील हल्ल्याची धार अधिक धारदार करत म्हणाले.

माझी विश्वासहार्यता कायम

महाराष्ट्रातील माझी विश्वासहार्यता अजून संपलेली नाही. जनतेला माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ दिलेला नाही. कापसाला भाव देईन, जळगावचा विकास करेल अशी आश्वासने मी काही दिली नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

आता नैतिकता कुठे राहिलीय?

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ज्यांना हे कालपर्यंत भ्रष्ट म्हणत होते, नॅशनल करप्ट पार्टी म्हणून म्हणत होते, आज गिरीश महाजन यांचे नेते त्यांच्यासोबत खुर्चीला खुर्ची लावून बसतात. त्यामुळे आता कुठे नैतिकता राहिली आहे, असेही ते म्हणाले. आम्हाला नैतिकता शिकवू नये. करप्ट पार्टीसोबत तुम्ही युती करून जवळ आलात. त्यामुळे महाराष्ट्रातील तुमची लाचारी दिसून येते, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत…
www,jantaexpress.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *