महाराष्ट्रात ओबीसी समाजाची रॅली काढण्याचे नियोजन केले जात आहे. यात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांना आम्ही निमंत्रण देणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. या रॅलीत देशभरातील ओबीसी समाजाचे आजी-माजी मुख्यमंत्री, नेते यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले.काँग्रेसकडे चार वर्षानंतर आलेल्या विरोधी पक्ष नेते पदी वर्णी लागल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून ते प्रथमच नागपूरला आले होते. त्यानंतर प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
विदर्भातील 60 जागांपैकी 45 आमदार आघाडीचे
भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आहे. असे असले तरी आमची ताकद कमी झाली नसल्याचे ते म्हणाले. आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील 60 जागांपैकी 45 आमदार महाविकास आघाडीच्या निवडूण येतील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध
विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पद देण्याऐवजी दुसऱ्याला देण्यात यावे, यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वरीष्ठांना पत्र पाठवले होते, या वृत्ताला त्यांनी फेटाळले. ते म्हणाले की, आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, वरीष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जातो, तो सर्व मान्य करतात, असेही त्यांनी सांगितले. आमच्या पक्षात कोणतेही नाराजी नसल्याचेही ते म्हणाले.