• Wed. Apr 30th, 2025

लातूर जिल्ह्यातील३५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर: आदर्श आचारसंहिता लागू १८ डिसेंबर रोजी होणार मतदान

Byjantaadmin

Nov 10, 2022
लातूर जिल्ह्यातील३५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर: आदर्श आचारसंहिता लागू
१८ डिसेंबर रोजी होणार मतदान
लातूर,(जिमाका) : ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासह थेट सरपंच निवडीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतीचे सदस्य आणि थेट सरपंच निवडीसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होईल. आजपासून या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी सोमवार, २८ नोव्हेंबर २०२२ ते  शुक्रवार, २ डिसेंबर २०२२ दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत.
नामनिर्देशनपत्र छाननी सोमवार, ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी अकरापासून सुरू होईल. तसेच बुधवार, ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी तीननंतर  निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
आवश्यक असल्यास रविवार, १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान घेतले जाईल. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाणी २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २३ डिसेंबर २०२२ पर्यंत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
रेणापूर, औसा, निलंगा आणि चाकूर या चार तालुक्यात संपूर्ण आणि उर्वरित तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे ती ग्रामपंचायत व लगतची गावे इथे आचारसंहिता लागू असेल. शहरी भागात आचारसंहिता लागू नसली तरी ग्रामपंचायतीच्या मतदारावर प्रभाव पडेल, अशा प्रकारची कोणतीही कृती अगर भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या
अहमदपूर- ४२
औसा-६०
चाकूर- ४६
जळकोट- १३
लातूर- ४४
निलंगा- ६८
शिरूर अनंतपाळ – ११
उदगीर- २६
देवणी-८
रेणापूर-३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed