भारत जोडो ही देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारी यात्रा आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन यात्रेत सहभागी होण्याचे लातूरकरांना आवाहन
लातूर (प्रतिनिधी):-भारत जोडो यात्रा ही देशाला पुन्हा एकदा एकतेच्या, समानतेच्या व विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारी यात्रा आहे. या विकासाच्या यात्रेत आपण सर्वांनी वारकरी म्हणून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लातूर ग्रामीण’चे आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी बुधवारी येथे केले.
काँग्रेसचे नेते श्री. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यातून मार्गस्थ होणार आहे. या यात्रेचे ११ नोव्हेंबर रोजी लातूर जिल्ह्याच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील चोरंबा फाटा येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस भवन लातूर येथे आढावा बैठक आयोजिण्यात आली होती. लातूर ग्रामीण व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, युवक, महिला, शेतकरी, कामगार व सर्व स्तरातील नागरिकांनी या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. धिरज देशमुख यांनी याप्रसंगी केले.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, गणपतराव बाजुळगे, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, धनंजय देशमुख, अनंतराव देशमुख, प्रवीण पाटील, दगडूसाहेब पडिले, एकनाथ पाटील, पूजा इगे, मदन भिसे, सचिन दाताळ, ज्ञानोबा गवळे आदींसह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी, लातूर, रेणापूर, औसा तालुका काँग्रेस कमिटीचे आजी-माजी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. धिरज देशमुख म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चले जाव असा नारा देऊन बदल घडवून आणला. त्यामुळे ब्रिटिशांना देश सोडावा लागला. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी बेरोजगारी, महागाई, सामाजिक आर्थिक असुरक्षितता, जात धर्म भाषा प्रांत यातील भेदभाव असे देशातील विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. ज्या विचाराने काँग्रेस पक्षाचा जन्म झाला, तो विचार, ती सर्वसामान्य जनता यांना सोबत घेऊन ते पदयात्रा करीत आहेत.
काँग्रेसचा विचार हा देशाच्या हिताचा, कल्याणाचा विचार आहे. बहुसंख्यांक, अल्पसंख्यांक, उपेक्षित, वंचित अशा सर्वांची मोट बांधण्याचे काम यात्रेतून होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात भीती आहे. ती दूर करण्यासाठी, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे. एकमेकांना जोडणारी ही यात्रा आहे, असे श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.
माजी आमदार वैजनाथ शिंदे म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. या यात्रेचे साक्षीदार व्हावे. माजी आमदार त्र्यंबक भिसे म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या भारत जोडो यात्रेचे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करू. कल्याणकारी, समस्या व चिंतामुक्त भारतासाठी ही यात्रा आहे. यात्रेचा संदेश प्रत्येकांनी आपल्या गावांपर्यंत घेऊन जायचा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी केले. प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष घोडके यांनी आभार मानले.