कोल्हापूर/ सांगोला: निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे वय वर्ष ४२, रा. वासूद, ता. सांगोला याचा बुधवारी धारदार शस्त्राने वार करून अमानुष खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून खुनाच्या तपासासाठी सांगोला पोलिसांनी चंदनशिवे यांचे जुने मित्र असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत २०१६ साली मार्च मध्ये झालेल्या नऊ कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील संशयित आणि सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतून सुरज चंदनशिवे याचं निलंबन करण्यात आलं होतं. त्या प्रकरणाचा तपास सांगली व कोल्हापूर येथील स्थानिक पोलिस यंत्रणा करत आहे. चंदनशिवे यांचा मृत्यू झाल्यानं आता वारणानगर चोरी प्रकरणाचं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरज चंदनशिवे हे वासूद गावचे रहिवासी असून वारणानगर येथील मार्च २०१६ साली शिक्षक कॉलनीत झालेल्या नऊ कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील संशयित आणि सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ते निलंबित सहायक पोलिस निरीक्षक होते. ते सध्या सांगली येथील पोलिस ठाण्यात रोज वासूद येथून जात होते. त्यांनी सध्या कासेगाव ता. पंढरपूर येथे दूध संकलनाचा प्रकल्पही सुरू केला होता.यामुळे सुरज चंदनशिवे रोज वासूद येथे मुक्कामी होते.
काय आहे वारणा दरोडा प्रकरण?
मार्च २०१६ मध्ये वारणानगर येथील एका शिक्षण संस्थेच्या इमारतीमधून सुमारे नऊ कोटी १८ लाखांची रक्कम लंपास झाली होती. यावेळी मैनुद्दिन मुल्ला रा. सांगली हा काही दिवस वारणानगर येथील याच शिक्षण संस्थेत वाहनचालक म्हणून काम करत होता. संस्थेच्या एका इमारतीत मोठी रक्कम असल्याची माहिती त्याला होती. त्याने रात्रीच्या वेळी काही रक्कम लंपास केली. त्यातून सांगलीतील दोन पोलिसांना महागड्या दुचाकी भेट दिल्या होत्या . कोल्हापूर पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुल्ला याच्यासह सांगली एलसीबीकडील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे आणि अन्य सहकाऱ्यांवर वारणानगरात जाऊन दोनदा मोठ्या रकमेवर डल्ला मारणे आणि सांगली, कोल्हापुरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून हा प्रकार लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. सुरज चंदनशिवे आणि सात पोलिसांवर गुन्हा दाखल झाला होता. वारणा दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दिन मुल्ला याचा देखील २०२१ मध्ये खून करण्यात आला होता.