दिल्ली सेवा शर्ती विधेयक हे लोकशाही विरोधी, असंविधानिक आणि संघराज्य पद्धतीच्या विरोधात आहे. भारतासारख्या लोकशाही देशात भाजपच्या नेत्यांकडून वापरला जाणारा नियंत्रण हा शब्द योग्य नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपनं जाहीरनाम्यात दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासनं दिलं होतं याची आठवण करुन दिली. नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली सेवा शर्ती विधेयकावर बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला. भाजपनं आता राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून सरकारमध्ये सामील करुन घेतलं आहे त्यामुळं आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी माफी मागावी, अशी देखील मागणी केली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्या बारामती मतदारसंघात येऊन नॅचरली करप्ट पार्टी असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. आता त्यांच्याकडून स्पष्टीकरण हवंय, कारण ते आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत सत्तेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नॅचरली करप्ट पार्टी नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आम्ही जेव्हा तुमच्या विरोधात असतो तेव्हा वाईट असतो. तुमच्यासोबत असल्यावर चांगलं असतो, असं चालणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.सुप्रिया सुळे यांनी प्रतिभा शरद पवार यांची लेक असल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं. भाजप वारंवार त्यांना जनतेचा जनादेश असल्याचं म्हणतं. पण, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पंजाब आणि नवी दिल्लीतील जनतेनं जनादेश दिला आहे. भाजप देशभरात एक आणि दिल्लीसाठी एक अशी विरोधाभास असणारी भूमिका का घेत आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.