• Fri. May 9th, 2025

शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका, नाशिकच्या तरुणाला भाजपच्या मीडिया सेलची जबाबदारी

Byjantaadmin

Aug 4, 2023

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे याच्या खांद्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. निखिल भामरे याची भाजपच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा येथील आहे. त्याने गेल्यावर्षी शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, “वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग.” निखिल भामरेच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. निखिल भामरे याच्यावर राज्यभरात ७ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच त्याला अटकही करण्यात आली होती. यानंतर निखिल भामरे जवळपास महिनाभर तुरुंगात होता.मात्र, आता त्याच निखिल भामरे याला भाजपकडून मीडिया सेलचे सहसंयोजक पद देण्यात आले आहे. या सगळ्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका करणाऱ्या निखिल भामरेला अधिकृत पद दिल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar Nikhil Bhamre

कोण आहे निखिल भामरे?

निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा येथे राहणारा आहे. दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे तो बी फार्मसीचं शिक्षण घेत आहे. भामरे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी संबंधित असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली होती.

निखिल भामरेने मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर निखिल भामरे याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. जे कठीण काळात भक्कमपणे पाठीशी उभे राहीले, त्या देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार. आपण केलेल्या मदतीचा मी सदैव ऋणी राहील. पुन्हा आलोय त्या प्रत्येकाचे आभार मानायला ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मला व माझ्या कुटूंबाला कठीण काळात मदत केली. ज्यांच्या मुळे आज मला पूर्वीपेक्षा जास्त मजबूत झाल्यासारखे वाटते. दिंडोरी (नाशिक) पासून ते ठाणे, पुण्यापासून ते वर्तकनगर ते मावळ पर्यंत ते शेवटी मुंबई उच्च न्यायालयात माझ्या या केस मधे कोर्टात माझी बाजू भक्कमपणे मांडत या केसला लढ्याचं रूप देणाऱ्या लिगल टिमच्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद, असे ट्विट निखिल भामरे याने केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *