प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळं मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.नितीन देसाई यांनी हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शकही होते. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जेजे कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचं शिक्षण घेतलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटसृष्टीत कारकिर्द सुरू केली आहे. मुंबईजवळील कर्जतमध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ सुरू केला होता. या स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन चंद्रकांत देसाई हे गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त एनडी स्टुडिओमध्ये थांबलेले होते. परंतु आज सकाळी स्टुडिओतील कर्मचाऱ्यांना देसाई त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळं एनडी स्टुडिओमध्ये एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांचा मृतदेह फासावरून खाली काढण्यात येणार आहे. त्यानंतर देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु त्यांनी आत्महत्या केली आहे की यामागे घातपात आहे?, याचा पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.नितीन चंद्रकांत देसाई यांनी आगामी प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती काही मोजक्याच सहकाऱ्यांना दिली होती. त्यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांनी देसाई यांना फोन केले. परंतु नितीन देसाई यांनी कुणाचाही फोन रिसीव्ह केला नाही. त्यानंतर आता पोलीस अधिकारी तसेच अनेक स्थानिक नागरिक एनडी स्टुडिओमध्ये पोहचले आहे.
नितीन देसाई यांनी नेमकी कोणत्या कारणामुळं आत्महत्या केली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. याशिवाय महाराष्ट्रातील राज्यातील अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार त्यांचा आदर्श घेत काम करण्याचं स्वप्नं पाहत होता. परंतु आता त्यांनी अचानक एक्झिट घेतल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात आहे.