पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त ८ वर्षांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एका मंचावरआले. या कार्यक्रमाची खूप आधीपासून चर्चा सुरू होती. या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीवरूनमहाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. अखेर शऱद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.शरद पवार मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे पवारांच्या राजकीय भूमिकांविषयी शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांसह अनेक राजकीय विश्लेषकांनी शरद पवारांमुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, शरद पवारांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. त्यामुळे पवारांसारख्या अनुभवी नेत्यांनी लोकांमधला संभ्रम दूर करावा. शरद पवारांनी त्यांची भूमिका, जी त्यांनी आधीच घेतली आहे, ती स्पष्ट करून लोकांमधील संभ्रम दूर केला तर अधिक चांगलं होईल.एका खासगी संस्थेने घेतलेला हा कार्यक्रम होता. अशा कार्यक्रमात सहभागी होणं काही चुकीचं वाटत नाही. परंतु देशात एकीकडे भाजपाप्रणित एनडीएविरुद्ध सर्व विरोधकांची एकजूट होत असताना तसेच इंडियाच्या बॅनरखाली सर्व विरोधी पक्षांची मोट बांधली जात आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या अशा कार्यक्रमातील उपस्थितीमुळे जनतेमध्ये थोडंसं संभ्रमाचं वातवरण निर्माण होत आहे.