राज्यातील बऱ्याच भागामध्ये मागील १०-१५ दिवसांपासून डोळे येण्याची (Conjunctivitis) साथ चालू आहे. शहरामध्ये देखील तुरळक प्रमाणात असे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामूळे नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. तरी नागरिकांच्या माहितीसाठी खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.
माहिती :-
पावसाळयामध्ये हवेतील अद्रता वाढून प्रामुख्याने “अॅडीनो” व्हायरसमुळे डोळे येणे (Conjunctivitis) या आजाराची लागण होत असते. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे याचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमण होते. औषधोपचाराने डोळे ४-५ दिवसात बरे होतात तरीदेखील नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
लक्षणे :-
डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यातून पिवळसर चिकट द्रव वाहने, डोळ्यात खाज येणे, डोळे चिकटने, प्रकाशाचा त्रास होणे इ.
उपाययोजना :-
- डोळे आल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये.
- डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना काळा चष्मा वापरावा.
- आपला रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स, टॉवेल इ. वस्तू इतरांना वापरण्यास देवू नये.
- डोळ्यांना सतत हात लावू नये. हात लावल्यावर हात स्वच्छ धुवावेत.
- नेत्रचिकित्सक यांचेकडून तपासणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार घ्यावेत.
- लहान मुलांना याची लागण झाल्यास पालकांनी अश्या मुलांना आजार बरा होईपर्यंत शाळेत पाठवू नये.
- शाळेतील शिक्षकांनी देखील याबाबत विद्यार्थ्यांना डोळे आल्यास आजारातून बरा होईपर्यंत शाळेत न येणेबाबत सूचना द्यावी.
- निवासी शाळा / वसतीगृह अशा ठिकाणी डोळे आलेल्या मुलाला / मुलीला किंवा व्यक्तीस वेगळे ठेवण्यात यावे, जेणेकरून त्याचा प्रसार इतर विद्यार्थ्यांमध्ये होणार नाही.