• Wed. Jun 18th, 2025

अशी लाल परी होणे नाही! धावत्या बसचे छप्पर हवेत…

Byjantaadmin

Jul 27, 2023

गडचिरोली : राज्याच्या वाहतुकीचा कणा म्हणून एसटी महामंडळाच्या लालपरीला ओळखले जाते. दुर्गम गावात पोहचण्यासाठी या बसचा आधार आजही नागरिक घेत असतात. मात्र, या लाल परीची दुरवस्था सांगणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गडचिरोली येथील आहे. छप्पर तुटलेली एक बस रस्त्यावर धावतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाडीचे छप्पर धोकादायकरित्या हवेत उडत असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यातल्या दक्षिण भागातील हा व्हिडिओ आहे. येथील राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस या नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावरून धावत आहे. अनेक गाड्यांच्या छताची दुरवस्था झाली आहे. अशा गाड्यातून नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका बसचे छप्पर हे तुटलेले आहे. असे असतांना ही बस रस्त्यावर धावत असून बसचे छप्पर देखील हवेत उडतांना दिसत आहे.

ही बस गडचिरोलीहुन अहेरीकडे जात होती. यावेळी चामोर्शी मार्गावर अर्धवट छप्पर तुटलेल्या अवस्थेत ही बस अनेक किलोमीटर धोकादायकरित्या धावत होती. ही बाब रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. जेव्हा त्यातील एकाने याचा व्हिडिओ तयार केला तसेच तो समाजमध्यमांवर उपलोड केला. काही नागरिकांनी ही बाब चलकांच्या लक्षात आणून दिली. यावेळी चालकाला ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी ही बस थांबवत बस पुढे आगारात नेऊन लावली. मात्र, तो पर्यंत हा व्हिडिओ चंगलाच व्हायरल झाला होता.

नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिल्या. एकाने तर आधुनिक भारताची नवी वाहतूक व्यवस्था अशी टीका केली आहे आहे तर, एकाने विकसित भारतातील स्मार्ट लाल परी अशी टीका या व्हिडिओवर केली आहे. तर काहींनी नागरिकांच्या जीवाशी सरकारने खेळणे थांबवावे असे म्हटले आहे. तर एसटी महामंडळाच्या विकासासाठी सरकार कधी प्रयत्न करेल असा सवाल काहींनी विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *